तेल अविव – इस्रायली फौजांनी गाझामध्ये हमास दहशतवादी संघटनेविरोधातील आपली कारवाई सुरूच ठेवली असून गाझाच्या दक्षिणेकडील खान युनिस शहरामध्ये इस्रायली सेनेच्या पॅराट्रुपरने हमासच्या अड्ड्यांवर जोरदार कारवाई केली आहे. या आक्रमक चढाईमध्ये हमासचे डझनभर दहशतवादी मारले गेले आहेत. मुख्य म्हणजे स्नायपर फायर टँक आणि हवाई हल्ल्यांच्या मदतीने हमासच्या मुख्य दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
या कारवाईवर जवळच्या इमारतीतून लक्ष ठेवणाऱ्या एका दहशतवाद्याला इस्रायलच्या ११ व्या इन्फन्ट्रीच्या यिफ्तान ब्रिगेडने ठार केले. इस्रायलच्या लढाऊ विमानांनीही यावेळी हवाई हल्ले केले आणि संभाव्य प्रतिहल्ल्यांना वेळीच रोखले. अल-अमान शहराच्या शेजारील भागात कालपासून ही कारवाई सुरू आहे. एका दुसऱ्या मोहिमेदरम्यान आयडीएफच्या मगलान कमांडोंनी दहशतवाद्यांच्या अन्य काही ठिकाणांवरही हल्ले केले. यामध्ये हमासच्या लष्करी मुख्यालयाचाही समावेश आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शस्त्रे होती. येथे झालेल्या धुमश्चक्रीमध्ये दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. खान युनिस शहराच्या मध्यभागी असलेल्या शरणार्थ्यांच्या छावणीवर ओझेड कमांडोंनीही जोरदार कारवाई केली आते आणि तेथील दहशतवाद्यांना संपवले. गाझाच्या उत्तरेला इस्रायलच्या ५ व्या इन्फन्ट्री ब्रिगेडने देखील हमासचा मोठा शस्त्रसाठा ताब्यात घेतला आणि काही दहशतवाद्यांना ठार केले आहे.