रफाह, (गाझा पट्टी) – इस्रायली फौजांनी आज पुन्हा गाझा पट्ट्यातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या अल-शिफा रुग्णालयावर छापा घातला. या रुग्णालयाच्या आवारात हमासच्या दहशतवाद्यांनी पुन्हा जम बसवल्याच्या आरोपातून हा छापा घालण्यात आला. दहशतवाद्यांनी रुग्णालयाच्या आवारातून इस्रायली सैनिकांवर गोळीबार केल्याचा आरोप इस्रायली सैनिकांनी केला. या रुग्णालयात हजारो पॅलेस्टिनींनी आश्रय घेतल्याचा दावा पॅलेस्टिनींनी केला आहे.
या रुग्णायलाच्या तळघरात हमासचे कमांड सेंटर असल्याच्या संशयातून इस्रायलच्या सैनिकांनी यापूर्वी अल शिफा रुग्णालयावर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये छापा घातला होता. लष्कराने भूमिगत बंकरकडे जाणारा एक बोगदा उघड केला होता तसेच अनेक शस्त्रास्त्रे, दारुगोळाही हॉस्पिटलच्या आत सापडला होता. परंतु हे पुरावे आधीच्या दाव्यांपेक्षा कमी पडले आणि टीकाकारांनी लष्करावर बेपर्वाईने नागरिकांचे जीवन धोक्यात आणल्याचा आरोप केला होता.
आज इस्रायली सैनिक आणि रणगाड्यांनी रुग्णालयाच्या परिसराला वेढा घातला. त्यानंतर परिसरातील अनेक इमारतींमध्ये घुसून शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आले. ही धुमश्चक्री सुरू असताना रुग्णालयाच्या आवारातील रुग्ण, परिचारक, कर्मचारी आणि डॉक्टरांना कोणतीही हालचाल करता आली नाही आणि ते वेगवेगळ्या इमारतींमध्ये अडकून पडले, असे काही साक्षीदारांनी सांगितले.
इस्रायली सैनिकांनी केलेल्या गोळीबारामुळे रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला आग लागल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
सुमारे ३० हजार लोक रुग्णालयात आश्रय घेत आहेत, यात रुग्ण, वैद्यकीय कर्मचारी आणि सुरक्षिततेसाठी घर सोडून पळून गेलेल्या लोकांचा समावेश आहे, असे मंत्रालयाने सांगितले.