पुणे – दहशतवादी यासिन भटकळचे तत्कालिन वकील ॲड. जहीरखान पठाण यांनी इसिसने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासिन हा कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहे.
याबाबत ॲड. पठाण यांनी सरन्यायाधीश, पंतप्रधान, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, बार कौन्सिल ऑफ इंडिया, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, जिल्हा न्यायाधीश पुणे, पुणे बार असोसिएशन आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना तक्रार अर्ज सादर केला आहे. याद्वारे ॲड. पठाण यांनी संरक्षण देण्याची मागणी केली आहे. सध्या ऍड. पठाण जर्मन बेकरी प्रकरणात काम पाहत नाहीत.
ॲड. पठाण केलेल्या तक्रार अर्जानुसार, “मुंबईतील एका व्यक्तीचा चेन्नईतील अशील मोहंमद दाऊद यांचा करोडो रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता. यातून आर्थिक फसवणुकीचा गुन्हा खडक पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यातील दाऊद हे संशयित आरोपी आहेत. त्यांच्यातर्फे ॲड. पठाण कामकाज पाहतात. ॲड. पठाण या प्रकरणाच्या तडजोडीनिमित्त चेन्नई येथे गेले होते. तेथे सचिन टेमघिरे याने संबंधित व्यक्तीच्या वतीने “येथून पुढे माझ्या ऐवजी मौलाना नावाचा माणूस बोलेल’ असे सांगितले.
त्यानंतर मौलाना नावाच्या व्यक्तीने पठाण यांच्याशी संपर्क साधला. त्याने त्यांना मेसेज करून या प्रकरणातून “तुम्ही बाहेर पडा, निघून जा नाहीतर तुमच्या जीवाचे बरे वाईट करेल’ (युअर लाइफ इन डेन्जर. माय पर्सन विथ मिट यू) अशी धमकी दिली. तसेच त्याने धमकी देत इसिसचा माणूस असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे.’
याविषयी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, “धमकी दिल्याबाबत वकिलांचा अर्ज आमच्याकडे आला आहे. त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.’