डोर्लेवाडी( प्रतिनिधी)- देशसेवा बजावत असताना पंजाब येथे मंगळवारी सीआरपीएफ जवान अशोक बापूराव इंगवले यांचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील सोनगाव येथील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र, जवान अशोक बापूराव इंगवले यांचे पार्थिव कऱ्हा नीरा नदीच्या पवित्र संगमावरील सोनगाव या त्यांच्या मूळगावी आणल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आलेल्या जवानांनी तोफांची सलामी दिली.
बारामतीचे प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, सीआरपीएफ जवान तालुक्यातील नेतेमंडळी, नातेवाईक यांनी वीर जवान इंगवले यांना श्रद्धांजली वाहिली. सीआरपीएफ जवान अशोक इंगवले हे आठ वर्षापासून सीआरपीएफमध्ये सेवा बजावत होते. सध्या ते रांची या ठिकाणी कार्यरत होते. निवडणुकांमध्ये ते पंजाबमध्ये बंदोबस्तावर असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला.
जवान इंगवले यांचे पार्थिव सोनगावमध्ये आणण्यात आले. वीर जवान अमर रहे ! अशोक इंगवले अमर रहे! अशा घोषणा दिल्या. गुणवडी, डोर्लेवाडी, झारगडवाडी येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून फुलांची उधळण करीत वीर जवान अशोक इंगवले यांना श्रद्धांजली अर्पण केली. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, आई ,वडिल, लहान भाऊ , दोन वर्षांचा मुलगा आणि दोन महिन्याची मुलगी असा परिवार आहे..