न्यूयॉर्क – इसिस या दहशतवादी संघटनेचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानी डॉक्टरला अमेरिकेत 18 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. “इसिस’ला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणे आणि एकट्याच्या बळावर अमेरिकेत दहशतवादी हल्ला करण्याची तयारी करण्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.
मुहम्मद मसूद असे या पाकिस्तानी डॉक्टरचे नाव असून त्याला 18 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच “इसिस’ला मदत केल्याबद्दल त्याला 5 वर्षांच्या देखरेखीतून मुक्त करण्यात आले. असे न्याय विभागाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्याला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दोषी ठरवण्यात आले होते.
मसूद हा पाकिस्तानातील परवानाधारक डॉक्टर असून मिनेसोटा येथी रोकेस्टरमधील एका वैद्यकीय संशोधन केंद्रामध्ये संशोधन सहायक म्हणून तो काम करत होता. जानेवारी 2020 ते मार्च 2020 दरम्यान मसूद मेसेज ऍपवर त्याला परदेशातील दहशतवादी संघटनेमध्ये सामील होत असल्याचे मेसेज पाठवत होता.
मसूदने वारंवार इस्लामिक स्टेट ऑफ इराक अर्थात “इसिस’मध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याने फेब्रुवारी 2020 मध्ये एकट्याच्या बळावर अमेरिकेत दहशतवादी हल्ले करण्याची तयारीदेखील दाखवली होती. मसूदने शिकागो, इलिनॉय येथून अम्मान, जॉर्डन येथे विमानाचे तिकीट खरेदी केले आणि तेथून सीरियाला जाण्याची योजना आखली.
गेल्या वर्षी करोनाच्या निर्बंधांमुळे तो जॉर्डनला जाऊ शकला नाही. म्हणून तो जहाजामधून इसिसच्या क्षेत्रात जाण्याची मदत मिळवण्यासाठी लॉस एंजेलिसला जाण्यासाठी निघाला. पण मिनियापोलिस सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आले होते.