नवी दिल्ली -देशातील नामांकित अर्थतज्ञांपैकी एक असणाऱ्या इशर जज अहलुवालिया यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. त्या नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया यांच्या पत्नी होत.
अर्थव्यवस्था आणि आर्थिक क्षेत्रांशी निगडीत अनेक पैलूंचा सखोल अभ्यास असणाऱ्या इशर यांना पद्मभूषण या नागरी सन्मानाने गौरवण्यात आले होते. इंडियन काऊन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स या नावाजलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदावरून त्या मागील महिन्यातच प्रकृतीच्या कारणास्तव पायउतार झाल्या होत्या.
मॅस्सॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (एमआयटी) त्यांनी पीएचडी संपादन केली. दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी एमएची पदवी मिळवली. नागरी-औद्योगिक-सामाजिक क्षेत्र विकासाबरोबरच व्यापक आर्थिक सुधारणा हे इशर यांच्या संशोधनाचे विषय होते. इंडस्ट्रियल ग्रोथ इन इंडिया हे त्यांनी लिहिलेले प्रभावशाली पुस्तक अनेकांच्या अभ्यासाचा विषय ठरले. इशर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले.