अहमदाबाद -कर्णधार हार्दिक पंड्याचे नाबाद अर्धशतक व राहुल तेवतीयाच्या फटकेबाजीनंतरही गुजरातला आयपीएल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून अवघ्या 5 धावांनी पराभव पत्करावा लागला. ईशांत शर्माने अखेरच्या षटकात तेवतीयाला बाद केले व सामना फिरवला. तेवतीयाने 19 व्या षटकांत सलग तीन षटकार खेचत दिल्लीचा पराभव स्पष्ट केला होता. मात्र, अखेरच्या षटकात ईशांतने सामन्याचे चित्रच पालटवले.
दिल्लीने विजयासाठी ठेवलेल्या 131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातच्या डावाची सुरुवातही निराशाजनक झाली. वृद्धिमान साहा पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर बाद झाला. हे षटक खलिल अहमदने निर्धाव टाकले. पाठोपाठ शुभमन गिलही अनरीच नोर्जेच्या गोलंदाजीवर बाद झाला व गुजरातची अवस्था 2 बाद 18 अशी बनली. त्यानंतर विजय शंकरही ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला.
त्यानंतर डेव्हिड मिलरही बाद झाल्याने त्यांचा डाव 4 बाद 32 असा संकटात सापडला. त्यावेळी कर्णधार हार्दिक पंड्या व अभिनव मनोहर यांनी 62 धावांची भागीदारी केली व डाव सावरला. पंड्याने अर्धशतक पूर्ण केले. मनोहरही चांगला खेळत असताना अनावश्यक फटका मारून 33 चेंडूत 1 षटकारासह 26 धावा करून परतला.
तो बाद झाल्यावर पंड्याला साथ देण्यासाठी आलेल्या राहुल तेवतीयाने सलग तीन षटकार खेचत गुजरातला विजयाचा विश्वास दिला होता. मात्र, त्याला ईशांतने बाद केले व सामना फिरला. तत्पूर्वी,गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज महंमद शमीने केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्ली कॅपिटल्सचा डाव अवघ्या 130 धावांवर कोसळला. शमीने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 4 गडी बाद करत दिल्लीच्या फलंदाजीची वाताहत केली. मात्र, अमन हकिम खानने जिद्दीने फलंदाजी करत अर्धशतक फटकावले. त्याने अक्सर पटेल व रिपल पटेल यांच्या साथीने संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय डावातील पहिल्याच चेंडूवर फिलीप सॉल्टला बाद करत शमीने चुकीचा ठरवला. त्यानंतर कर्णधार वॉर्नर 2 धावांवर अनावश्यकपणे धावबाद झाला.
रेली रॉसोला बाद करत शमीने त्यांना आणखी एक धक्का दिला. तर मनीष पांडेलाही तंबूचा रस्ता दाखवत दिल्लीला आणखी संकटात लोटले. यावेळी प्रियम गर्गने अक्सर पटेलसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शमीने त्यालाही 10 धावांवर बाद करत दिल्लीची स्थिती 5 बाद 23 अशी अत्यंत दयनीय केली.
परंतु पटेलने अमन हकिम खानसह सहाव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली व डाव सावरला. स्थिरावलेला पटेल मोहित शर्माच्या गोलंदाजीवर 27 धावांवर परतला. त्याने या खेळीत 30 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावला.
अमनने जिद्दीने फलंदाजी करताना अर्धशतक साकार केले. मात्र, यानंतर तोदेखील लगेचच परतला. त्याने आपल्या 51 धावांच्या खेळीत 44 चेंडूत 3 चौकार व 3 षटकार फटकावले. तसेच त्याने रिपल पटेलच्या साथीत संघाचे शतक फलकावर लावले.
रिपलही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने 23 धावांच्या खेळीत 13 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावला. दिल्लीचा डाव 8 बाद 130 धावांवर रोखला गेला. गुजरातकडून महंमद शमीने सर्वाधिक 4 गडी बाद केले. मोहित शर्माने 2 तर, रशिद खानने 1 बळी घेतला.
लक्षवेधी
दिल्लीचे पाच फलंदाज पाच षटकांत बाद
शमीचे चार षटकांत एकूण 4 बळी
पहिल्याच चेंडूंवर सॉल्टला केले बाद
अक्सर व अमनची अर्धशतकी भागीदारी
अमन हकिम खानची अर्धशतकी खेळी
गुजरातच्या प्रमुख फलंदाजांकडूनही निराशा
गिल, साहा, शंकर, मिलर स्वस्तात परतले
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 8 बाद 130 धावा. (अमन हकिम खान 51, अक्सर पटेल 27, रिपल पटेल 23, महंमद शमी 4-11, मोहित शर्मा 2-33, रशिद खान 1-28). गुजरात टायटन्स – 20 षटकांत 6 बाद 125 धावा. (हार्दिक पंड्या नाबाद 59, अभिनव मनोहर 26, राहुल तेवतीया 20, ईशांत शर्मा 2-23, खलिल अहमद 2-24).