नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन केले. ब्रिटनमध्ये गेल्या २१० वर्षांतील सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेल्या सुनक यांनी मंगळवारी राजे चार्ल्स तृतीय यांची भेट घेऊन पदाची सूत्रे स्वीकारली. सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होणार हे स्पष्ट झाल्यापासूनच भारतामध्येही आनंदनाचे वातावरण आहे.
सुनक पंतप्रधान झाल्यानंतर आता पुन्हा एकदा ब्रिटनकडे असलेल्या कोहिनूर हिऱ्यासंदर्भातील चर्चा समाजमाध्यमांवर सुरु झाली आहे. त्यातच सुनक पंतप्रधान झाल्याने आता पुन्हा भारताने हा जगातील सर्वात मौल्यवान हिरा असलेला कोहिनूर परत आणण्यासाठी हालचाली कराव्यात असे म्हटले जात आहे. या चर्चा सुरु असताना एका भारतीय उद्योगपतीने तर थेट कोहिनूर परत आणण्यासाठी सुनक यांचे अपहरण करण्याचा सल्ला दिला आहे.
उद्योगपती हर्ष गोयंका हे त्यांच्या मजेदार आणि तितक्याच वैशिष्ट्यपूर्ण ट्विट्ससाठी चर्चेत असतात. सध्या त्याचे असे एक ट्वीट व्हायरल झाला आहे. ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर काही वेळाने गोयंका यांनी केलेल्या ट्वीटमध्ये आता सुनक पंतप्रधान झाले आहेत तर कोहिनूर कसा परत आणता येईल याबद्दलची माहिती चार स्टेप्समध्ये दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये…
माझ्या मित्राने कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी सांगितलेली कल्पना :
१) ऋषी सुनक यांना भारतामध्ये आमंत्रित करा.
२) बंगळुरुच्या वाहतूक कोडींमधून त्यांचं अपहरण करा जेव्हा ते त्याच्या सासरच्या मंडळींना भेटायला जात असतील.
३) त्यांच्याऐवजी आशिष नेहराला युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान म्हणून परत पाठवा. कोणालाही याची भनक लागणार नाही.
४) नेहराला कोहिनूर परत करण्यासंदर्भातील कायदा संमत करण्यास सांगून पाठवूयात.
कोहिनूर भारतात परत येईल.