पुण्यात एका आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणारा 34 वर्षीय ओंकार याने दोन वर्षांपूर्वी परवडणाऱ्या घराच्या योजनेत फ्लॅट खरेदी केला होता. ही योजना 2020 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र, ताबा मिळाल्यानंतर त्या घरात राहण्याबाबत त्याने साशंकता व्यक्त केली आहे. जर ते घर विकण्याचा निर्णय घेतला तर गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो, असा विचार त्याने केला आहे.
पुणे परिसरात एवढ्या वाजवी किमतीत फ्लॅट मिळणे शक्यच नाही आणि त्यामुळे कमी कालावधीत अधिक परतावा मिळवण्याच्या उद्देशाने ओंकार विचार करत आहे. अर्थात या योजना गुंतवणुकीसाठी उपयुक्त असल्याचा विचार करणारा ओंकार हा एकटाच नाही. गेल्या काही वर्षांपासून परवडणाऱ्या घराच्या योजनांमुळे प्रॉपर्टी बाजारात आशेचा किरण निर्माण झाला आहे. कारण अन्य योजनांच्या तुलनेत परवडणाऱ्या घराने चांगला परतावा दिला तर अन्य योजनांकडून नगण्य परतावा मिळत आहे.
– जगदीश काळे
मागणी आणि पुरवठा
गेल्या पाच वर्षांत रिअल इस्टेटमध्ये परवडणाऱ्या घराचा अपवाद वगळता अन्य क्षेत्रात घसरणच अनुभवली आहे. या सेगमेंटच्या लोकप्रियतेमुळे बिल्डर मंडळींना गृहप्रकल्प सुरू करण्यात उत्साह आला. एनरॉक प्रॉपर्टी कन्सल्टंटचे अध्यक्ष अनुज पुरी यांच्या मते, 2015 पासून रिअल इस्टेट क्षेत्रात परवडणाऱ्या घरांचे योगदान वाढत चालले आहे. सध्याच्या सरकारकडून परवडणाऱ्या घराच्या खरेदीबाबत अधिकाधिक प्रोत्साहन दिले जात असून ग्राहकांनीही त्यास प्रतिसाद दिला आहे. परिणामी मागणी वाढत चालल्याने विकासकांनी देखील परवडणाऱ्या घरांच्या योजना विकसित करण्यावरच भर दिल्याचे दिसून येते. 2017 नंतर निवासी बाजारात मागणीत वाढ झाली आहे.
पुरवठ्याच्या तुलनेत मागणी अधिक
रिअल इस्टेट कन्सल्टंट फर्म नाइट फ्रॅंक इंडियाच्या अर्धवार्षिक (जुलै ते डिसेंबर 2018) अहवालानुसार या कालावधीत सुरू झालेल्या गृहप्रकल्पांपैकी 60 टक्के फ्लॅट हे 50 लाखांच्या आतच होते. बहुतांश विकासकांनी स्वस्त आणि मिड-रेंज सेगमेंटवर भर दिला आहे. प्रकल्प सुरू केल्यानंतरही मागणीच्या तुलनेत पुरवठा कमीच आहे. दिल्लीत 2018 मध्ये परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत 22 टक्के वाढ दिसली. हा आकडा मोठा नसल्याचे मानले जाते. कारण सध्या या सेगमेंटमध्ये बोटावर मोजण्याइतपतच विकासक काम करत आहेत. मागणी अधिक आहे आणि पुरवठा तुलनेने कमी दिसून येतो.
मात्र, या सेगमेंटमध्ये अधिक बिल्डर सहभागी होतील, तेव्हा त्यात जबरदस्त वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बहुतांश तज्ज्ञांच्या मते, परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. कारण काही महिन्यांपासून विकासकांनी या सेगमेंटकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. क्रिसिल रिसर्चचे संचालक राहुल प्रिथिआनी म्हणतात की, कमी आणि मध्यम उत्पन्नधारकांच्या मागणीचे महत्त्व विकासकांना कळून चुकले आहे. त्यामुळे परवडणाऱ्या घरांबाबत बिल्डर सकारात्मक राहतील, असे दिसते. कालांतराने रिअल इस्टेट क्षेत्राला अधिक बुस्ट करणारे क्षेत्र म्हणून परवडणाऱ्या घराच्या श्रेणीकडे पाहिले जाऊ शकते. किंबहुना आलिशान फ्लॅट निर्मितीबरोबरच परवडणाऱ्या घरांकडेही बिल्डरचा ओढा राहील, असे सांगितले जात आहे.
गुंतवणूक करायला हवी का?
उपयोगासाठी किंवा गुंतवणुकीसाठी पैशाचा वापर होत असताना पैशाची काळजी सर्वांना असतेच. ओंकारसारख्या तरुणांना परवडणाऱ्या घरातील गुंतवणूक ही फायदेशीर आहे, असे वाटत राहते. या क्षेत्रात लवकरच वाढ होईल, अशीही अपेक्षा बाळगून आहेत. या सेगमेंटने केवळ ग्राहकांना आकर्षित केले नाही तर गुंतवणूकदारांना प्रोत्साहित देखील केले आहे. आलिशान फ्लॅटच्या तुलनेत परवडणाऱ्या घरांत गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर असल्याचे मत काहींचे झाले आहे.
त्यामुळे अधिक परतावा देणारा सेगमेंट म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. सध्याच्या काळात अनेक गुंतवणूकदार हे भविष्यातील मोठा फायदा म्हणूनच पाहात आहेत. अनेक घटकांमुळे या क्षेत्रात चांगला परतावा मिळेल, असे गृहित धरले जात आहे. प्रारंभी काही राज्य सरकारनी परवडणाऱ्या घरांच्या योजनेला अधिक बळकटी आणण्याचे प्रयत्न केले आहे. त्याच्या किमतीतही अधिक सुलभता आणली आहे. उदा. हरियाणा सरकारने परवडणाऱ्या घराच्या धोरणाच्या अनुषंगाने एका डेव्हलपर ग्राहकाकडून अधिकाधिक 4 हजार रुपये प्रति चौरस फूट भाव आकारू शकतो, असे निश्चित केले आहे. याशिवाय पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत ग्राहकांना 2.67 लाखांची सबसिडीही दिली जात आहे. आकर्षक भत्त्यांमुळे देखील या क्षेत्राकडे आकर्षण वाढले आहे. शेवटी एक गुंतवणूकदार वार्षिक सरासरी 8 ते 10 टक्के परतावा मिळण्याची अपेक्षा बाळगून असतो.
अर्थात काही तज्ज्ञांच्या मते, परवडणाऱ्या घरांच्या योजना चांगला परतावा देणाऱ्या नाहीत. कारण शहरात चांगल्या लोकेशनला परवडणाऱ्या घरांच्या याजेनांचे प्रमाण फारसे दिसून येत नाही. उपनगरात किंवा शहरालगतच्या परिसरात परवडणाऱ्या घराच्या योजना राबविल्या जातात. त्यामुळे अशा घरातून मिळणारा परतावा हा सामान्यच राहील, असे काहींचे म्हणणे आहे. जर आपल्यालाही परवडणारे घर खरेदी करायचे असेल तर त्यापूर्वी ठिकाणाची चाचपणी करा. त्याठिकाणच्या विकास योजनांचे आकलन करा. याबरोबरच व्यवहार निश्चित करण्यापूर्वी किंमतीची तुलना करणे गरजेचे आहे.