अलाहाबाद -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेवरील निवडीला आव्हान देणारी याचिका शुक्रवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली. केंद्रीय राखीव पोलीस दलातून (सीआरपीएफ) बडतर्फ करण्यात आलेल्या तेजबहादूर यादव या जवानाने ती याचिका दाखल केली होती.
उत्तरप्रदेशच्या वाराणसी मतदारसंघातून मोदी लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाने यादव यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज त्रुटींमुळे निवडणूक अधिकाऱ्यांन फेटाळून लावला. त्यामुळे यादव निवडणूक लढवू शकले नव्हते. त्यानंतर त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज अयोग्यरित्या नामंजूर करण्यात आल्याचा आरोप केला होता.
मोदींची निवड रद्दबातल ठरवण्याची मागणीही त्या याचिकेत करण्यात आली होती. मात्र, यादव निवडणुकीतील उमेदवार नसल्याचे नमूद करत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. यादव उमेदवार नसल्याने विजयी उमेदवाराच्या निवडीला आव्हान देण्याचा अधिकार त्यांना नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.