पुणे – भारतीय जनता पक्षाने चार राज्यात एक हाती सत्ता मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा भक्कम असल्याचे स्पष्ट झालेले असतानाच मुंबई आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मिळालेले 5 ते 6 महिने भाजपसाठी बोनस ठरणार आहेत. याबाबतचे वक्तव्य मुंबईत पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित फडणवीस यांनी हे जाहीरपणे सांगितल्याने हाच फंडा पाटील यांच्याकडून पुणे पालिकेसाठीही अवलंबला जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची सुत्रे फडणवीस तर पुणे येथील निवडणुकीची सुत्रे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
विधानसभा निवडणुकीत गोव्यासह चार राज्यांत भाजपने मोठी मुसंडी मारल्यानंतर त्याचे उत्साही पडसाद सर्वत्र उमटले. यातूनच आगामी महापालिका निवडणुकीसाठीही भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. पुणे महापलिकेवर भाजपची सत्ता असताना विरोधक राष्ट्रवादी कॉंग्रेसने कडवे आव्हान निर्माण करण्याची सुरूवात केली होती. परंतु, ओबीसी आरक्षण मुद्यावरून निवडणुका लांबणीवर पडल्या त्यातच आता भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. भाजपाने आगामी सहा महिन्यांत छुप्या प्रचारावर भर देणार आहे. तर, याबाबतची सुत्रे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडेच असणार आहेत. पाटील यांचे निकटवर्तीय संघटन सरचिटणीस राजेश पांडे तसेच शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यावरही वेगवेगळी जबाबदारी असल्याचे पाटील यांच्याकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीचे सुत्रं पाटील यांच्याच हाती असल्याचे स्पष्ट होत आहे. तर, खासदार गिरीश बापट, सभागृहनेते गणेश बीडकर, महापौर मुरलीधर मोहोळ यांचे गटही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मदतीला असणार आहेत, तशी यंत्रणाही तयार झाली असल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार लक्ष देणार?
आगामी महापालिका निवडणुकीत खरी लढत ही सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात असणार आहे. भाजपची सूत्रे चंद्रकांत पाटील यांच्याकडे असणार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्रे यावेळी कोणाच्या हाती असणार? याबाबत उत्सुकता आहे. याकरिता नेहमीप्रमाणे अजित पवार यांचे नाव घेतले जात असले तरी राजकीय स्थिती पाहता यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे हे लक्ष देणार असेही सांगितले जात आहे.