मुंबई – प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यानंतरही शाहबाज अहमद व दिनेश कार्तिक यांनी केलेल्या वादळी फलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर बेंगळुरुने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 4 गडी राखून पराभव केला.
विजयासाठी 170 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बेंगळुरुला कर्णधार फाफ डुप्लेसी व अर्जुन रावत यांनी अर्धशतकी सलामी दिली. मात्र, हे दोघेही पाठोपाठ बाद झाले. तसेच माजी कर्णधार विराट कोहली धावबाद झाला व बेंगळुरुचा पराभव दिसू लागला. त्याचवेळी शाहबाज अहमद व कार्तिक ही जोडी जमली व त्यांनी राजस्थानच्या अननुभवी गोलंदाजीवर हल्ला चढवला. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 67 धावांची भागीदारी केली व संघाचा विजय जवळ आणला.
शाहबाज अनावश्यक फटका मारून 26 चेंडूत 4 चौकार व 3 षटकार फटकावत 45 धावांवर बाद झाला. मात्र, त्याचे कोणतेही दडपण कार्तिकने घेतले नाही व हर्षल पटेलला हाताशी घेत विजय साकार केला. 20 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पटेलने षटकार खेचला व संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तो 4 चेंडूत 9 धावा करुन नाबाद राहिला. तर, कार्तिकने आपल्या नाबाद 44 धावांच्या खेळीत 23 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 1 षटकार अशी आतषबाजी केली. राजस्थानकडून यजुवेंद्र चहल व ट्रेन्ट बोल्ट यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. नवदीप सैनीने 1 बळी घेतला.
तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 169 धावा केल्या. सलामीवीर जोस बटलर, देवदत्त पडीक्कल व शेमरन हेटमायर यांच्या उपयुक्त फलंदाजीमुळे त्यांना समाधानकारक धावसंख्या उभारता आली.
बेंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसी याने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजी दिली. बेंगळुरुच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यासमोर राजस्थानच्या कसलेल्या फलंदाजांनी एकेरी धावाही घेण्यात अपयश येत होते. त्यातच यशस्वी जयस्वाल पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्यानंतर बटलरने पडीक्कलसह दुसऱ्या गड्यासाठी 70 धावा जोडल्या. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात पडीक्कल 29 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार फटकावत 37 धावांवर परतला. कर्णधार संजू सॅमसननेही निराशा केली.
यावेळी शेरन हेटमायरने बटलरला सुरेख साथ दिली. या जोडीने संघाचे दीडशतक फलकावर लावले. बटलरने आपले अर्धशतकही थाटात पूर्ण केले. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 83 धावांची अखंडीत भागीदारी केली. बटलरने नाबाद 70 धावांची खेळी करताना 47 चेंडूत 6 षटकार फटकावले. त्याला सुरेख साथ देताना हेटमायरने 31 चेंडूत 4 चौकार व 2 षटकार यांच्या मदतीने नाबाद 42 धावा केल्या. बेंगळुरुकडून हर्षल पटेल, डेव्हीड विली व वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 3 बाद 169 धावा. (देवदत्त पडीक्कल 37, जोस बटलर नाबाद 70, शेमरन हेटमायर नाबाद 42, हर्षल पटेल 1-18, डेव्हीड विली 1-29, वनिंदू हसरंगा 1-32). रॉयल चॅलेंजर बेंगळुरु – 19.1 षटकांत 6 बाद 173 धावा. (फाफ डुप्लेसी 29, अर्जुन रावत 26, शाहबाज अहमद 45, दिनेश कार्तिक नाबाद 44, हर्षल पटेल नाबाद 9, यजुवेंद्र चहल 2-15, ट्रेन्ट बोल्ट 2-34, नवदीप सैनी 1-36).