मुंबई – कर्णधार फाफ डुप्लेसी, रजत पाटीदर व दीनेश कार्तिक यांनी केलेल्या अफलातून फलंदाजीनंतर लेग स्पीन गोलंदाज वनिंदू हसरंगाच्या भेदक फिरकी गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या रविवारी झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा 67 धावांनी पराभव केला. यासह बंगळुरूने हैदराबादकडून मागील पराभवाचा बदलाही घेतला. हैदराबादने मोसमातील पहिल्या सामन्यात बंगळुरूला फक्त 68 धावांत गुंडाळत 9 विकेट राखून विजय मिळवला होता.
आजच्या सामन्यात बेंगळुरुचा कर्णधार फाफ डुप्लेसीने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने विराट कोहलीसह डावाची सुरुवात केली. मात्र, कोहली खाते उघडण्यापूर्वीच बाद होत गोल्डन डकचा शिकार ठरला. मात्र, त्यानंतर डुप्लेसीने नाबाद 73 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 50 चेंडूत 8 चौकार व 2 षटकार फटकावले. त्याला साथ देताना रजत पाटीदारने 48 धावांची खेळी केली. त्याला अर्धशतक पूर्ण करता आले नसले तरीही त्याने या खेळीत 38 चेंडूत 4 चौकार व 2 षटकार फटकावले.
त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक 33 धावांची खेळी करताना 24 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार खेचले. तो बाद झाल्यावर दीनेश कार्तिकने नाबाद 30 धावांची आक्रमक खेळी करताना 8 चेंडूत 1 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली व संघाला 20 षटकांत 3 बाद 192 धावा उभारुन दिल्या.
विजयासाठी 193 धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव 19.2 षटकांत 125 धावांवर संपूष्टात आला. त्यांच्याकडून राहुल त्रिपाठीने दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याने या खेळीत 37 चेंडूत 6 चौकार व 2 षटकार मारले. त्यानंतर एडन मार्करमने 21 तर निकोलस पूरनने 19 धावा करत थोडीफार लढत दिली. मात्र, बेंगळुरुच्या वनिंदू हसरंगाने 5 गडी बाद करत त्यांच्या फलंदाजीची वाताहत केली. त्यांच्या चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही तर चार फलंदाजांना दोनअंकी धावाही करता आल्या नाहीत.
हसरंगाने घेतल्या पाच विकेट
बंगळुरूकडून वनिंदू हसरंगाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. वनिंदू हसरंगाने शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करताना दोन विकेट्स घेतल्या आणि सामन्यात एकूण पाच विकेट्स घेतल्या . त्याने या षटकात एकही धाव न देता सलग दोन चेंडूंत शशांक सिंग आणि उमरान मलिक यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हसरंगाने सामन्यात चार षटकांच्या गोलंदाजीत 1 मेडनसह 18 धावा दिल्या आणि पाच खेळाडूंना बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
रॉयल चॅलेंजर बेंगळुरु – 20 षटकांत 3 बाद 192 धावा. (रजत पाटीदार 48, ग्लेन मॅक्सवेल 33, फाफ डुप्लेसी नाबाद 73, दीनेश कार्तिक नाबाद 30, जगदीश सुचीत 2-30). सनरायझर्स हैदराबाद – 19.2 षटकांत सर्वबाद 125 धावा. (राहुल त्रिपाठी 58, एडन मार्करम 21, निकोलस पूरन 19, वनिंदू हसरंगा 5-18, जोश हेझलवूड 2-17).