मुंबई – सलामीवीर शिखर धवन व भानुका राजपक्षा यांच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने आयपीएल स्पर्धेतील सोमवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी 188 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजा याने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यात तंदुरुस्त होऊन संघात परतलेला पंजाबचा नियमित कर्णधार मयंक आग्रवालने धवनसह डावाची सुरुवात केली. आग्रवाल पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. या जोडीने 37 धावांची सलामी दिली.
आग्रवाल 21 चेंडूत 18 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर धवनने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत राजपक्षासह दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली व संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. राजपक्षा स्थिरावलेला असताना 32 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 42 धावा काढून बाद झाला.
Innings Break!
An 88* from Shikhar Dhawan and well supported by Bhanuka Rajapaksa (42) propels #PBKS to a total of 187/4 on the board.
Scorecard – https://t.co/V5jQHQZNn0 #PBKSvCSK #TATAIPL pic.twitter.com/oJ1297kek7
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2022
दरम्यान, धवनने आपले अर्धशतक पूर्ण केले. राजपक्षा बाद झाल्यावर लियम लिव्हिंगस्टोनने धवनला साथ देत संघाला दीडशतकी धावांच्यापुढे मजल मारून दिली. लिव्हिंगस्टोनही भरात आलेला असतानाच अनावश्यक फटका मारून 19 धावांवर परतला. त्याने या खेळीत 7 चेंडूत 1 चौकार व 2 षटकार फटकावले.
धवन शतकाकडे कूच करत असतानाच जॉनी बेअरस्टोने आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात आपली विकेट बहाल केली. त्याचवेळी धवनला फलंदाजीची पुरेशी संधी मिळाली नाही व त्यामुळे तो शतकापासून वंचित राहिला. त्याने 59 चेंडूत 9 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 88 धावांची खेळी केली. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर पंजाबने 20 षटकांत 4 गडी गमावून 187 धावा उभारल्या. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्होने 2 गडी बाद केले. महिशा तिक्शणाने 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक :-
पंजाब किंग्ज – 20 षटकांत 4 बाद 187 धावा. (भानुका राजपक्षा 42, लियम लिव्हिंगस्टोन 19, मयंक आग्रवाल 18, शिखऱ धवन नाबाद 88, ड्वेन ब्राव्हो 2-42, महिशा तिक्शणा 1-32).