मुंबई – सलामीवीर क्वांटन डिकॉक याच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव केला.
लखनौ संघाला कर्णधार लोकेश राहुलने डिकॉकच्या साथीत अर्धशतकी सलामी दिली. राहुल स्थिरावलेला असताना 24 धावांवर परतला. त्यानंतर डिकॉकने आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुल परतल्यावर आलेल्या इवान लुईसने निराशा केली. मात्र, एका बाजूने डिकॉकने डाव सावरुन फलंदाजी केली. तो शतकाकडे कूच करत असतानाच 80 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 52 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार व 2 षटकार फटकावले. त्यानंतर आलेला दीपक हुडाही लवकर बाद झाला. त्यानंतर कृणाल पंड्या व आयुष बदोनी यांनी विजयाची औपचारीकता पूर्ण केली.
सलामीवीर पृथ्वी शॉ याच्या वादळी अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार ऋषभ पंत व सर्फराज खान यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या गुरुवारी झालेल्या आयपीएल स्पर्धेतील लढतीत विजयासाठी 150 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
लखनौचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकत दिल्लीला पहिल्यांदा फलंदाजी दिली. शॉ याने डेव्हीड वॉर्नरसह डावाची सुरुवात केली. झाकून शॉ याने वादळी फलंदाजी केली. या जोडीने 67 धावांची सलामी दिली, त्यात वॉर्नरचा वाटा केवळ 4 धावांचा होता. शॉ याने दमदार अर्धशतकी खेळी केली मात्र, त्याचा लाभ दिल्लीला घेता आला नाही. शॉ देखील 34 चेंडूत 9 चौकार व 2 षटकार फटकावताना 61 धावा करुन बाद झाला. लगेचच रोवमन पॉवेलही परतला. त्यानंतर मात्र, पंत व सर्फराजने डाव सावरत संघाला 20 षटकांत 3 बाद 149 अशी समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली.
पंतने 36 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार यांच्या मदतीने नाबाद 39 धावा केल्या. तर सर्फराजने नाबाद 36 धावांची खेळी करताना 28 चेंडूत 3 चौकार फटकावले. लखनौकडून लेग स्पीन गोलंदाज रवी बिष्णोईने 2 गडी बाद केले. कृष्णाप्पा गौतमने 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक –
दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 3 बाद 149 धावा. (पृथ्वी शॉ 61, ऋषभ पंत नाबाद 39, सर्फराज खान नाबाद 36, रवी बिष्णोई 2-22, कृष्णाप्पा गौतम 1-23). लखनौ सुपर जायंट्स – 19.4 षटकांत 4 बाद 155 धावा. (क्वांटन डीकॉक 80, लोकेश राहुल 24, कृणाल पंड्या नाबाद 19, आयुष बदोनी नाबाद 10, कुलदीप यादव 2-31, ललित यादव 1-21, शार्दुल ठाकूर 1-29).