मुंबई – रॉयल चॅलेंजर बेंगळुरुचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी सज्ज बनला असून येत्या शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याद्वारे संघात परतणार आहे. विवाहासाठी भारतात दाखल झालेल्या मॅक्सवेल करोनाच्या नियमानूसार विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे.
तो बेंगळुरुच्या डगआऊटमध्ये परतला असला तरीही त्याला यंदाच्या स्पर्धेतील पहिला सामना खेळण्यासाठी शनिवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मात्र, त्याचा संघात परतण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे बेंगळुरु संघाला दिलासा मिळाला आहे.
मॅक्सवेल पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलिया संघातून खेळला नसला तरीही ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाच्या नियमानुसार मंडळाशी संलग्न असलेला कोणताही खेळाडू सहा एप्रिलच्या पूर्वी आयपीएल सामने खेळू शकणार नव्हता. त्यामुळे मॅक्सवेलला बेंगळुरु संघात दाखल होता आले नव्हते.