IPL 2024 KKR vs RCB : आयपीएल 2024 चा 10 वा सामना RCB आणि KKR यांच्यात आज होणार आहे. या सामन्यात, दोन्ही संघ एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता आमने-सामने असतील. आरसीबीने आतापर्यंत दोन सामने खेळले असून या कालावधीत एक सामना जिंकला आहे. केकेआरने केवळ एकच सामना खेळला असून तो जिंकला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस हे गेम चेंजर्स ठरू शकतात. आंद्रे रसेल कोलकातासाठी कमाल करू शकतो. रसेल आणि कोहली यांनी त्यांच्या मागील सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली होती.
आंद्रे रसेल – आंद्रे रसेल त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी खूप लोकप्रिय आहे. रसेलने हैदराबादविरूध्दच्या गेल्या सामन्यात 25 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या होत्या. यादरम्यान 3 चौकार आणि 7 षटकार मारले. तसेच गोलंदाजीत 2 बळीसुध्दा घेतले होते. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 113 सामने खेळले आहेत. रसेलने या कालावधीत 2326 धावा केल्या आहेत. नाबाद 88 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. रसेल आरसीबीविरुद्धही कमाल करू शकतो. तो फिनिशरच्या भूमिकेतही बसतो.
विराट कोहली – स्टार फलंदाज विराट कोहली आक्रमक फलंदाजीत माहिर आहे. पण परिस्थिती पाहून तो खेळतो. या मोसमातील आपल्या पहिल्याच सामन्यात कोहली विशेष काही करू शकला नाही. पण त्याने डाव सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी केली. कोहलीने मागील सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध 49 चेंडूत 77 धावांची खेळी केली होती. कोहलीने या मोसमात दोन डावात 98 धावा केल्या आहेत. या कालावधीत एक अर्धशतक झळकावले आहे. कोहली कोलकाताविरुद्धही आपली ताकद दाखवू शकतो.
फाफ डु प्लेसिस – आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने अनेक प्रसंगी आपली ताकद दाखवून दिली आहे. त्याने आतापर्यंत 132 सामन्यात 4,171 धावा केल्या आहेत. डुप्लेसिसची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या 96 धावा आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात डू प्लेसिसला काही विशेष करता आले नाही. तो 3 धावा करून बाद झाला. पण चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. मात्र, या सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. आता ते केकेआरविरुद्ध मैदानात उतरतील.