अहमदाबाद -शुभमन गिल, डेव्हीड मिलर व राहुल तेवतिया यांनी केलेल्या अफलातून आक्रमक फलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने सुरुवातीच्या पडझडीनंतरही मंगळवारी आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 208 धावा करण्याचे मोठे आव्हान ठेवले.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत गुजरातला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय अर्जुन तेंडुलकरसह सर्वच गोलंदाजांनी सार्थ ठरवला. अर्जुनने सलामीवीर वृद्धिमान साहाला बाद करत पहिले यश मिळवून दिले. त्त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्यासह प्रमुख फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले.
विजय शंकरनेही निराशा केली. मात्र, एका बाजूने शुभमन गिलने अर्धशतकी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. डेव्हीड मिलरने संघाचे शतक फलकावर लावले. गिलने अर्धशतक पूर्ण केल्यावर आपली विकेट गमावली. त्याने आपल्या 56 धावांच्या खेळीत 34 चेंडूत 7 चौकार व 1 षटकार फटकावला. तो परतल्यावर अभिनव मनोहरने मिलरला साथ देत संघाचे दीडशतक फलकावर लावले. मात्र, स्थिरावल्यानंतरही मनोहर 42 धावांवर बाद झाला. त्याने 21 चेंडूत 3 चौकार 3 षटकार फटकावले.
यानंतर मिलरही आपले अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्याने 46 धावांची खेळी करताना 22 चेंडूत 2 चौकार व 4 षटकार फटकावले. मात्र, बाद होण्यापूर्वी त्याने राहुल तेवतियाच्या साथीत संघाला द्विशतकी मजल मारून दिली.
गुजरातने सुरुवातीच्या घसरणीनंतरही मर्यादित 20 षटकांत 6 गडी गमावून 207 धावांचा डोंगर उभारला. तेवतिया अवघ्या 5 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 20 धावांवर नाबाद राहिला. रशीदन खानने नाबाद 2 धावा केल्या. मुंबईकडून पियुष चावलाने सर्वाधिक 2 गडी बाद केले.
गिलने साजरा केला आनंद
गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल याने या लढतीत अर्धशतकी खेळी करत आपला आनंद साजरा केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी भारतीय संघात गिलचा समावेश करण्यात आल्याचे वृत्त त्याला समजले व त्याने याच आनंदात अफलातून फलंदाजी केली.