IPL 2021 : विराटसेनेची विजयी घोडदौड; कोलकाता नाईट रायडर्सचा दारुण पराभव

चेन्नई – आयपीएलच्या दहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर 38 धावांनी मात केली. या मोसमात “विराटसेने’ने आयपीएलमध्ये पहिल्यांदा सलग तीन सामने जिंकत विजयी मालिका कायम ठेवली आहे.

बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करत 205 धावांचे विशाल लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात कोलकाताला 20 षटकात 8 बाद 166 धावांपर्यतच मजल मारता आली. निर्धारीत लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता संघाला शुभमन गिलच्या रूपात पहिला झटका बसला. गिलने 9 चेंडूत 21 धावा केल्या. त्यानंतर राहुल त्रिपाठी 20 चेंडूंत 25 धावांवर तंबूत परतला. नितीश राणा 18 धावा करून चहलच्या पहिल्या चेंडूवर देवदत्त पडिक्‍क्‍लकडे झेलबाद झाला. यानंतर संघाला दिनेश कार्तिकच्या रुपात चौथा धक्का बसला. चहलने कार्तिकला पायचीत केले. कर्णधार ईयान मॉर्गनला पटेलने 29 धावांवर विराटकरवी झेलबाद केले.

कोलकाताकडून आंद्रे रसेल सर्वाधिक 31 धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये त्याने फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली होती. मात्र, पटेलने त्याचा त्रिफळा उडवित विजय सुकर केला. तर हरभजन सिंह धावा आणि वरुण चक्रवर्ती धावा करून नाबाद परतले. बेंगळुरूकडून कायल जेमीसन 3, तर युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल सलामीला उतरले. मात्र, दुसऱ्याच षटकात विराट 5 धावा करुन वरुण चक्रवर्तीविरुद्ध बाद झाला. त्यापाठोपाठ रजत पाटीदारही त्याच षटकात 1 धाव करुन माघारी परतला. त्यामुळे बेंगळुरूचा संघ अडचणीत सापडला. पण असे असतानाच पडीक्कलसह चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ग्लेन मॅक्‍सवेलने आक्रमक खेळ करत संघाचा डावा सावरला.

मॅक्‍सवेलन 28 चेंडूत 9व्या षटकात आपले सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. तसेच पडीक्कलसह अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. मात्र, मॅक्‍सवेलला साथ देणारा पडीक्कल 12व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर 25 धावा करुन बाद झाला.
बेंगळुरूकडून पडीक्कल बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्‍सवेलला साथ देण्यासाठी एबी डिविलियर्स आला. त्यानेही मॅक्‍सवेलसह सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. मात्र, या दोघांची 53 धावांची भागीदारी मॅक्‍सवेल हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने संपली. मॅक्‍सवेलने 49 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 78 धावांची खेळी केली.

मॅक्‍सवेल बाद झाल्यानंतरही डिविलियर्सने त्याचा आक्रमक अंदाज कायम ठेवत चौकार-षटकारांची बरसात करत अर्धशतकही पूर्ण केले. त्याने 20व्या षटकात तब्बल 21 धावा वसूल केल्या. त्यामुळे बेंगळुरूने 200 धावांचा टप्पा सहज पार केला. 20 षटकांच्या अखेर डिविलियर्स 34 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 76 धावांवर नाबाद राहिला. तसेच काईल जेमिसन 11 धावांवर नाबाद राहिला. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने 2 विकेट्‌स घेतल्या. तसेच प्रसिद्ध कृष्णा आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ः 20 षटकात 4 बाद 204 (विराट कोहली 5, देवदत्त पडीक्कल 25, ग्लेन मॅक्‍सवेल 78, एबी डिविलियर्स नाबाद 76, काईल जेमिसन नाबाद 11. वरुण चक्रवर्ती 2-39, पॅट कमिन्स 1-34, प्रसिद्ध कृष्णा – 1-31)
कोलकाता नाईट रायडर्स ः 20 षटकात 8 बाद 166 (नितिश राणा 18, शुभमन गिल 21, राहुल त्रिपाठी 25, ईयान मॉर्गन 29, आंद्रे रसेल 31. कायल जेमीसन 3-41, हर्षल पटेल 2-17, युझवेंद्र चहल 2-34)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.