पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून, रोजच धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 24 तासांत पुन्हा तब्बल 2893 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 1 लाख 83 हजार 746 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 53 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
शनिवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (रविवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 2830 जणांना करोनाची लागण झाली असून, शहराबाहेरील 63 जणांचा करोना अहवाला सकारात्मक आला आहे. तर गेल्या 24 तासांत 53 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील 31 जण शहरातील रहिवासी होते. तर शहराबाहेरील 22 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 2380 वर पोहोचला असून शहराबाहेरील 1024 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 3404 ची संख्या आज गाठली.
गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील मोशी, सांगवी, भोसरी, घरकुल, काळेवाडी, पिंपरी, आकुर्डी, चिखली, चिंचवड, संत तुकारामनगर, कासारवाडी, तळवडे, वाकड, थेरगाव, पुनावळे, पिंपळे गुरव, रहाटणी, दिघी येथील 31 जणांचा समावेश आहे. तर महापालिका हद्दीबाहेरील पुणे, वडगाव शेरी, धानोरी, बाणेर, दौंड, मुंडवा, जुन्नर, सिंहगड, चिंचोली, आंबेगाव, थेऊर, चाकण, कोथरुड, हिंजवडी, कात्रज, हडपसर, वारजे, देहूरोड, मरकळ, खडकी येथील 22 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत शहरातील 1 लाख 58 हजार 684 जण करोनामुक्त झाले असून, शहराबाहेरील 10,170 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 2318 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 4250 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेल्या 10557 जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे.