पिंपरी – अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी बुधवारी गर्दी उसळली होती. पूजेचे साहित्य, सजावट साहित्य, गणेशमूर्ती, विद्युतमाळा, मखर आदींची खरेदी करताना नागरिक दिसत होते. करोनाबाबतच्या नियमांना पायदळी तुडवत उसळत असलेली ही गर्दी जणू काही तिसऱ्या लाटेला आमंत्रणच देत आहे.
शहरात सध्या करोनाची दुसरी लाट ओसरली आहे. परंतु अजूनही रोज करोनाचे 150 ते 175 बाधित रुग्ण आढळत आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. अशा प्रकारे बाजारपेठेत गर्दी होत राहिल्यास करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक स्वरुपातील गणेशोत्सव यंदाही साधेपणाने साजरा होत आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी देखावे किंवा मोठे मंडप उभारणे टाळले आहे. मात्र, घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा होत असल्याने त्यासाठी आवश्यक सजावट साहित्य, पूजा साहित्य आदींच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.
सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पिंपरीतील मुख्य बाजारपेठेत आज मोठी गर्दी झाली होती. शगुन चौक, पिंपरी कॅम्प, रिव्हर रस्ता या परिसरात खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक फिरताना दिसत होते.
सजावट साहित्य, मखर, पूजा साहित्य, गणेशमूर्ती, विद्युतमाळा आदींची खरेदी नागरिक करीत होते. काही नागरिक व व्यापारी मास्कचा योग्य पद्धतीने वापर करीत नसल्याचे आढळले. सोशल डिस्टंसिंगचा तर पुरता फज्जा उडाला होता.
चिंचवड येथील चापेकर चौक, गांधी पेठ आदी परिसरात गर्दी पाहण्यास मिळाली. प्रामुख्याने चापेकर चौक येथे पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती.