पी-नोट्‌सद्वारा गुंतवणूक वाढली

ऑगस्टपर्यंत तब्बल 74 हजार कोटींची गुंतवणूक

मुंबई -पी-नोट्‌सच्या माध्यमातून भारतीय शेअरबाजारात ऑगस्टपर्यंत तब्बल 74 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून हा दहा महिन्यांतील उच्चांक आहे. याचा अर्थ, भारतीय अर्थव्यवस्थेवरील परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा विश्‍वास वाढत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून पी- नोट्‌सच्या माध्यमातून गुंतवणूक वाढत आहे. परदेशातील ज्या गुंतवणूकदारांना नोंदणी न करता भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा असते, ते पी-नोट्‌सच्या माध्यमातून गुंतवणूक करतात.

सेबीने जारी केलेल्या माहितीनुसार, ऑगस्टअखेरीस विविध गुंतवणूक उत्पादनात पी-नोटस्‌च्या माध्यमातून झालेली गुंतवणूक 74 हजार कोटींवर गेली आहे. मार्च महिन्यामध्ये ही गुंतवणूक फारशी वाढली नव्हती. त्यामुळे या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

मात्र, दरम्यानच्या काळात लॉकडाऊन सुरू होऊनही भारतातील गुंतवणूक मात्र वाढली आहे, असे ग्रीन पोर्टफोलिओ या संस्थेचे सहसंस्थापक दिवाण शर्मा यांनी सांगितले. भारताचा विकासदर यावर्षी उणे 10 टक्‍क्‍यांच्या जवळपास राहणार आहे, असे बहुतांश विश्‍लेषकांनी याअगोदर सांगितले आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत भारताचा विकासदर जास्तच असेल असे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटते असे या आकडेवारीतून दिसून येते.

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडे सध्या 33.18 लाख कोटींचे मालमत्ता व्यवस्थापन आहे. दरम्यान, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ऑगस्ट महिन्यामध्ये भारतीय शेअरबाजारात 49 हजार 900 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. जुलै महिन्यामध्ये या गुंतवणूकदारांनी केवळ 3 हजार 300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

शेअर निर्देशांकांत घट

दरम्यान, शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 0.82 टक्‍क्‍यांनी म्हणजे 323 अंकांनी कमी होऊन 38,979 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 88 अंकांनी कमी होऊन 11,516 अंकांवर बंद झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.