माझ्या वडिलांच्या थडग्याचेही केले जातेय ऑडिट – मेहबुबा मुफ्तींचा आरोप

श्रीनगर – आपल्या विरोधात केंद्र सरकारने सर्व तपास यंत्रणा कामाला लावल्या असून त्यांनी आपल्यावरील एकही प्रकरण सिद्ध करून दाखवावे असे आव्हान पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांनी माझे वडिल मुफ्ती महंमद सईद यांच्या कबरीचेही ऑडिट सुरू केले आहे.

पीडीपी पक्षाच्या युवक शाखेच्या पदाधिकाऱ्याला एनआयएने दहशतवादाला आर्थिक मदत केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. त्यावर प्रतिक्रीया देताना त्यांनी हा आरोप केला. त्या म्हणाल्या की गेल्या दोन वर्षांपासून माझ्या सर्व व्यवहारांची व फायलींची चौकशी सरकारने केली. माझी बॅंक खातीही तपासण्यात आली पण त्यांना त्यात काहीही सापडलेले नाहीं.

आता तर त्यांनी माझ्या वडिलांच्या कबरीच्या कामाचेही ऑडिट सुरू केले आहे. हा अत्यंत घृणास्पद प्रकार असून सरकार आणखी किती खालच्या पातळीवर जाणार आहे असा सवालही त्यांनी केला आहे. मुफ्ती महंमद सईद यांचे सन 2016 मध्ये निधन झाले आणि त्यांचा दफन विधी दक्षिण काश्‍मीर मधील बिजबेहरा येथे त्यांच्या प्राचीन दफनभूमीत करण्यात आला आहे.

केंद्र सरकारला माझ्या विरोधात एकही पुरावा सापडला नाहीं म्हणून त्यांनी आता माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांना लक्ष्य करणे सुरू केले आहे असा आरोपही त्यांनी केला. ज्या वहिद नावाच्या आपल्या पक्षाच्या सहकाऱ्याला एनआयएने अटक केले आहे ते वहिद हे सच्चे लोकशाहीवादी कार्यकर्ते आहेत त्यांच्या विरोधातील आरोप बनावट आहेत असा आरोपही त्यांनी केला. त्या आज पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.