मागणीसाठी आपच्या खासदारांची संसद भवन परिसरात निदर्शने
नवी दिल्ली – दिल्लीच्या काही भागात गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलींच्या प्रकरणांची सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधिशांकरवी चौकशी करावी या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात जोरदार निदर्शने केली.
संजय सिंग, भगवंत मान, एन.डी. गुप्ता आणि सुशिल गुप्ता हे आम आदमी पक्षाचे खासदार त्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या विरोधातही घोषणा दिल्या. संजय सिंह म्हणाले की दिल्ली दंगलींच्या संबंधात संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची एक चौकशी समिती नेमूनही चौकशी करण्याची गरज आहे.
ते म्हणाले की दिल्ली दंगलींचा विषय गंभीर असतानाही त्यावर संसदेत चर्चा करण्याची अनुमती का दिली जात नाही. भाजपच्या कपिल मिश्रा, परवेश वर्मा आणि अनुराग ठाकूर यांच्या सारख्या नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे दिल्ली पेटली असा आरोप त्यांनी केला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही असेही त्यांनी नमूद केले.या भाजप नेत्यांच्या नार्को टेस्टचीही मागणी संजय सिंह यांनी केली. या चाचणीचे निष्कर्ष संपुर्ण देशापुढे जाहीर करावे असेही ते म्हणाले. या प्रकरणी आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील खासदारांनी कामकाज तहकुबीची सुचनाही राज्यसभा अध्यक्षांकडे दिली आहे.