इंदापूर तालुक्‍यातील दुग्धव्यवसाय अडचणीत

लॉकडाऊनमुळे दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटली : पशुखाद्याचे दर वधारले

– नीलकंठ मोहिते

रेडा – सध्या राज्यामध्ये करोना महामारीने जनता त्रस्त असल्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध शासनाने घातलेले आहेत. एकीकडे करोना रुग्ण कमी करण्यासाठी, हे निर्बंध फायदेशीर ठरत असले तरी देखील शेतीशी निगडीत उद्योगधंदे इंदापूर तालुक्‍यासह इतर ग्रामीण भागात प्रचंड अडचणीत सापडले आहेत. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा नागरिकांचा, कुटुंबाचा असणारा दुग्धव्यवसाय अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

पुणे जिल्ह्यात इंदापूर सह सर्व तालुक्‍यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्याच्या परिस्थितीत हा दुग्ध व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. दुध दर 1 एप्रिल रोजी 3.5 फॅट आणि 8.5 एसएनफसाठी प्रतीलिटर 28 रुपये दर होता. नंतर (दि.11) हाच दर 26.5 प्रतिलिटर झाला. (दि.16) हाच दर 25 रुपये झाला आहे. दूध पावडर, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत लॉकडाउनमुळे विक्रमी घट दिसून येत आहे. याचा परिणाम दरांवर झाला आहे. सध्या पावडरचा दर प्रतिकिलो 265 रुपयांवरून 200 रुपये झाला आहे.

बटरचा दर देखील प्रतिकिलो 300 रुपयांवरून 260 झालेला आहे. त्यामुळे हा परिणाम दुधाच्या दरावर होईल, असे तज्ज्ञाचे मत आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत सुधारणा झाली नाही तर दुधाचा भाव 3.5 फॅट आणि 8.5 एसएनफसाठी प्रतिलिटर 23 रुपये होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करायचा कशासाठी असे मोठे संकट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर उभे राहिले आहे.

गावाकडील शेतीशी निगडीत सर्वच उद्योगधंदे सध्या अडचणीत आलेले आहेत. डिझेलचे दर वाढल्यामुळे कच्चा मालांची वाहतूक करण्याचे दर देखील वाढलेले दिसून येत आहेत. पशुखाद्य निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालाचे दर देखील वाढले असल्याने पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत.

पशुखाद्यासाठी कच्चामाल सोयाबीनचा जुना दर 40 रुपये प्रति किलोने मिळत होता. तर आता नवीन दर याच सोयाबीनचा 70 रुपये प्रति किलो झाला आहे. सरकी पेंड वीस रुपये किलोने मिळत होती. हीच सरकी पेंड 42 रुपये प्रति किलोने झाली आहे. शेंगदाणा पेंड 28 रुपये प्रति किलोने मिळत होती तर आता हे दूध उत्पादक शेतकऱ्यांना शेंगदाणा पेंड 42 रुपये किलोने विकत घ्यावी लागत आहे.

मका 14 रुपये किलोने विकली जात होती. मका 18 ते 20 रुपये किलोने विकली जाते आहे. बायपास फट 54 रुपये प्रति किलोने मिळत होते. आता 101 रुपये प्रति किलो, असे होऊन बसले आहे. मोहरी पेंड 19 रुपये प्रति किलोचा जुना दर होता तर आता नवीन दर 27 रुपये प्रति किलोचा झाला आहे. त्यामुळे पशुखाद्य शेतकऱ्यांनी खरेदी करायची कसे, असा सवाल शेतकरी करीत आहेत.

इंदापूर तालुक्‍यामध्ये शेतकरी ज्वारी पिकवत असायचा. मात्र, आता ती परिस्थिती राहिलेली नाही. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ज्वारीचे क्षेत्र हद्दपार झाले आहे.करमाळा, जेऊर, माढा या सोलापूर जिल्ह्यातील तालुक्‍याच्या हद्दीतून दुभत्या जनावरांसाठी कडबा मोठ्या रकमा मोजून आणला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बाजू दुबळी झाली आहे.

शेतकऱ्यांच्या कुटुंबावर लॉकडाऊनचा घाला
तब्बल एक वर्षभर शेतकरी महामारी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेला आहे. बळीराजाला आधार देण्याची भूमिका राज्य सरकार व केंद्र सरकारने करावी. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी फळे घेतली आहेत. मात्र, सध्या या फळांना ग्राहक नाही त्यामुळे मातीमोल किमतीने विकली जात आहेत. औषधांचा देखील खर्च शेतकऱ्याला इंदापूर तालुक्‍यात हाती लागत नाही, अशी प्रतिक्रिया प्रगतशील शेतकरी साहेबराव मोहिते यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.