सिरींजद्वारे नशा; “एचआयव्ही’ची सजा

– संजय कडू

पुणे – नियमित अंमली पदार्थांचे (ड्रग्ज) व्यसन करणाऱ्यांना ही नशा चढेनाशी झालीय. यामुळे गर्द (ब्राऊन शुगर) पाण्यात अथवा एका विशिष्ट औषधामध्ये एकत्र करुन सिरिंजद्वारे घेतले जात आहे. याला नशेबाजांच्या भाषेत “फिक्‍सिंग’ म्हणतात. ही नशा बहुतांश वेळा समूहात केली जाते. यामुळे एकमेकांची सुई वापरली जाते. यातूनच “एचआयव्ही’ची शक्‍यता सर्वाधिक असते. ही संख्या काही वर्षांत सर्वाधिक आढळून आली आहे.

सिरींजद्वारे नशा करणाऱ्या व्यक्तीसमूहांत “एचआयव्ही’चा प्रसार रोखण्यासाठी जान्हवी फाउंडेशनमार्फत प्रकल्प राबवला जात आहे. संस्थेच्या अभ्यासानुसार “तंबाखू, गांजा, दारू, अफू व तत्सम पदार्थांची नशा केली जाते. विशेषतः अफू व अफुजन्य पदार्थाचे नशा करताना ब्राउन शुगर अर्थात बोली भाषेत गर्दची नशा त्याचा धुर करून केली जाते. ही नशा कमी होऊ लागते म्हणून तो व्यक्ती हा गर्द पाण्यात अथवा सहज मिळणाऱ्या एका विशिष्ट औषधात एकत्र करून टोचून घेतो. याला बोलीभाषेत “फिक्‍सिंग’ म्हणतात.’

नशेखोरांसाठी “सबस्टिट्यूशन थेरपी’
नशा करणाऱ्या व्यक्तींच्या वर्तणुकीत बदल करण्यासाठी समुपदेशन, एकमेकांची सुई न वापरण्यासाठी त्यांना नीडल सिरींज दिल्या जातात. यामुळे संभाव्य संसर्ग रोखता येतो. तसेच त्यांनी सुईद्वारे नशा करू नये, म्हणून एक विशिष्ट औषधी गोळी दिली जाते. याला “ओपिओइड सबस्टिट्यूशन थेरपी’ म्हणजे अफुजन्य पर्यायी उपचार पद्धती असे म्हणतात. दर महिन्याला एचआयव्ही, गुप्तरोगाची तपासणी केली जाते. तसेच सुईमुळे झालेले गळू, जखमांवर उपचार केले जातात.

“एचआयव्ही’चा संसर्ग घटतोय, पण…
मागील काही वर्षांत सरकार तसेच स्वयंसेवी संस्थांकडून जनजागृती करण्यात आली आहे. तसेच रेड लाईट परिसरातही नियमित जनजागृती आणि तपासणी केली जाते. यामुळे असुरक्षित शारीरिक संबंधामुळे एचआयव्हीचे प्रमाण घटले आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय उपचारांत आता प्रत्येक रुग्णाला नवीन सिरींज वापरली जाते. तसेच ब्लड बॅंकांमध्ये असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे “एचआयव्ही’बाधित रक्त पुरवले जाण्याची शक्‍यताही जवळपास नसल्यासारखीच आहे. मात्र, दुसरीकडे सिरींजद्वारे नशा करणाऱ्यांमध्ये “एचआयव्ही’चे प्रमाण वाढत आहे.

“एचआयव्ही’चा प्रसार प्रामुख्याने असुरक्षित लैंगिक संबंध, बाधित मातेकडून होणाऱ्या बाळाला व संसर्गिक रक्ताचा संपर्क रक्ताशी आल्यास होतो. तो रोखण्यासाठी महाराष्ट्र एड्‌स कंट्रोल सोसायटीमार्फत अतिजोखमीचा व्यक्तीसमूह म्हणजे देहविक्री करणाऱ्या स्त्रिया, तृतीयपंथी व्यक्तीसमूह, ट्रक चालक (ड्रायव्हर), स्थलांतर करणारा व्यक्तीसमूह व इंजेक्‍शनद्वारे नशा करणारा व्यक्तीसमूह यांच्यासाठी हस्तक्षेप लक्ष्यगट प्रकल्प राबविले जातात. इंजेक्‍शनद्वारे नशा करणारा व्यक्तीसमूहासाठी हस्तक्षेप लक्ष्यगट पिंपरी येथे प्रकल्प राबवला जातो.
– डॉ. विक्रम गायकवाड, उपाध्यक्ष, जान्हवी फाउंडेशन

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.