#महिला_दिन_विशेष : माझी वसुंधरा अभियानाच्या पर्यावरणदूत ‘अंकिता शहा’

इंदापूर शहरात विकासाभिमुख आणि रचनात्मक पायाभूत सुविधा, पर्यावरणपूरक घटकांची निर्मिती, आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रांत भरीव योगदान, अशी ओळख इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केली. माजी सहकारमंत्री, भाजपचे राज्यस्तरीय नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी शहराची ओळख देशभरात नेली आहे. यामागे अधिकारी, कर्मचारी, लोकसहभाग यांच्यात संवादाचा सेतू बनून शहराला एक झळाळी प्राप्त करून दिली आहे. “माझी वसुंधरा’ अभियानाच्या पर्यावरणदूत म्हणून नगराध्यक्षा अंकिता शहा यांची ओळख राज्यात निर्माण झाली आहे. खास महिलादिनानिमित्त अंकिता शहा यांच्या विकासात्मक कार्याचा घेतलेला आढावा…

देशपातळीवर इंदापूरचा नावलौकिक
इंदापूर शहराच्या विद्यमान नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी आपल्या कार्याचा ठसा सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण केला आहे. शहरामध्ये स्वच्छता चळवळ निर्माण करून नागरिकामध्ये जनजागृती करून शहर स्वच्छतेचा ठसा देशात निर्माण केला आहे. स्वच्छता सर्वेक्षणामध्ये सलग तीनवेळा राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट कामगिरी करून इंदापूर शहरातील नागरिकांची त्यांनी मने जिंकली आहेत. इंदापूर नगरपरिषदेस सलग दोन वर्षे 3 स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. थ्री स्टार मानंकानामुळे राज्यात व देशात नगरपरिषदेचा अनोखा दरारा निर्माण झाला आहे. त्यामुळेच इंदापूर नगरपरिषदेच्या कार्याच्या आलेखाची दखल राज्यातील इतर नगरपालिका घेत स्वच्छ व सुंदर शहर बनवण्याचा संकल्प करीत आहेत.

नगरपरिषदेकडून बायोडायव्हर्सिटी पार्क
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत हरित इंदापूर संकल्पना करण्यासाठी इंदापूर नगरपरिषदेने बायोडायव्हर्सिटी पार्कची निर्मिती केली आहे. इंदापूर नगरपरिषदेच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या वाढदिवसानिमित्ताने परिसरात वृक्षारोपण करून बायोडायव्हर्सिटी पार्कचे (जैवविविधता उद्यान) उद्‌घाटन करण्यात आले.

नगराध्यक्षा अंकिता शहा व नगरसेवकांनी इंदापूर शहरामध्ये स्वच्छतेची चळवळ नागरिकांमध्ये रुजविली आहे. राष्ट्रीय पातळीवर शहर स्वच्छतेचे मानांकन इंदापूर नगरपरिषदेने सलग तीन वर्षे संपादन केले आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत इंदापूर नगरपालिकेने लोकसहभागातून हरित इंदापूरसाठी शहरात वेगवेगळ्या भागात वृक्षारोपण केले आहे. तसेच भार्गव तलाव परिसरात इंदापूर नगरपालिकेने 5000 वृक्ष लागवड केली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह शेजारील परिसरात नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते जैवविविधता उद्यानाचे उद्‌घाटन करीत परिसरात केवळ वृक्षारोपणाच्या माध्यमातून हिरवाई नेसली आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी सजावटीच्या माध्यमातून या परिसरात एक संकल्पना साकारली जाणार आहे. त्यातून नागरिकांच्या सहकार्याने पर्यावरण संवर्धन जोपासण्यासाठीचा प्रयत्न केला जाणार आहे. शहराच्या नैसर्गिक सौंदर्य वृद्धिसाठी जैवविविधता उद्यानाची निर्मिती केली आहे. हरित इंदापूर ही संकल्पना साकारण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरात वृक्षारोपण आणि संवर्धन करून शहराचे वैभव वाढविले आहे.

एक सामान्य गृहिणी म्हणूनही ओळख
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद गोकुळदास शहा यांच्या त्या पत्नी आहेत. पूर्वीपासून इंदापूर शहरात शहा ब्रदर्स या नावाने शहा परिवाराचे मोठे कापड दुकान प्रसिद्ध आहे; मात्र सौ. अंकिता शहा यांनी या गोष्टीचा गर्व किंवा अहंपणा न करता सर्वसामान्य गृहिणीसारखे त्यांचे वर्तन आहे. आजदेखील या धावपळीत त्या स्वतः लवकर उठून आपल्या कुटुंबाचा स्वयंपाक करतात. नेहमी त्या भाजी मंडईपासून घरातील सर्व गोष्टी स्वतः सांभाळतात. तसेच कापड दुकानास देखील त्या वेळ देतात.

जिभेवर साखर ठेवून त्या नेहमी सर्वांशी बोलतात. मोठ्यांचा आदर करतात तर लहानाशी सुसंस्कृतपणे वागतात. कामाचा पाठपुरावा करून काम पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असतो. ज्येष्ठ नेते गोकुळदास (भाई) शहा, पद्माताई भोसले, मुकुंद शहा, भरत शहा यांचे नेहमी मार्गदर्शन घेत आपले कार्य त्या सक्षमपणे पूर्ण करत असतात. जागतिक महिला दिनानिमित्त 2018 मध्ये नगराध्यक्षा अंकिता शहा यांना “नारीशक्‍ती ऍवार्ड’ने सन्मानित करण्यात आले होते. तसेच “वासंती शामसुंदर जावडेकर’ पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले.

आयआयटी पवई सोबत सामंजस्य करार
शहरातमध्ये ज्येष्ठ नागरिक भवन पूर्ण झाले आहे. नवीन प्रशासकीय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे समाज मंदिर, व्यापारी संकुल, सुजल निर्मल योजना इत्यादी कामे पूर्णत्त्वाकडे आहेत. शहरातील दहा कोटी रुपये रकमेची रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित रस्ते विकासकामे सुरू आहेत शहरातील 80 टक्‍के भुयारी गटारींची कामे पूर्ण झाली असून, इंदापूर नगरपरिषदेने आयआयटी पवई (मुंबई) यांच्याशी सामंजस्य करार करून अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून नैसर्गिक जलस्रोताचा आराखडा तयार केला आहे. नवीन 8 घंटागाड्या आणल्या असून एकूण 12 घंटागाड्याच्या माध्यमातून ओला-सुका कचरा संकलित करण्याचे काम शहरामध्ये सुरू आहे.

भार्गव तलाव स्वच्छता मोहीम
खऱ्या अर्थाने माझी वसुंधरा हे अभियान इंदापूर शहराचे हरित अभियान म्हणून प्रभावीपणे राबवले जाते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2 ऑक्‍टोबर ते 31 मार्च 2021 कालावधीत “माझी वसुंधरा अभियान’ राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत इंदापूर नगरपरिषदेने भार्गव तलाव परिसर तसेच शहरातील विविध ठिकाणी आणि रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून इंदापूरकरांना स्वच्छ वातावरण आनंदी जीवन जगण्यासाठी मोठी मदत केल्याचे चांगले चित्र आज तालुक्‍यातील जनता डोळ्यांनी पाहत आहे.

स्वतंत्र सायकल ट्रॅक बनवणारी नगरपालिका
इंदापूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वतंत्र सायकल ट्रॅक बनवणारी नगरपालिका म्हणून राज्यात लौकिक प्राप्त केला आहे. इंदापूर तालुक्‍यात जवळपास 140 गावांचे जाळे जरी असले तरी ग्रामीण भागाचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, या तालुक्‍यामध्ये आरोग्य हीच धनसंपत्ती मानून ग्रामीण भागात आजही व्यायामाला प्राधान्य मोठ्या प्रमाणात दिले जाते.

याचबरोबरीने इंदापूर शहर देखील मागे अजिबात नाही. इंदापूर शहरात जेवढ्या सायकली गल्लीगल्लीत होत्या. त्यापेक्षाही अधिक दुचाकी सायकली आता व्यायामासाठी वाढलेल्या आहेत. दिवसाच्या सुरुवातीला पहाटेपासून इंदापूरकर सायकलीवर मुक्‍त संचार करीत असतात, ही गोष्ट नगरपरिषदेने ओळखून सायकल चालवण्यासाठी स्वतंत्र सायकल ट्रॅक, नवीन प्रशासकीय इमारत ते मंगेश पाटील हॉस्पिटल असा निर्माण केला आहे. शारीरिक तंदुरुस्ती, आरोग्य आणि पर्यावरण संतुलन साधण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम या माध्यमातून साकारला आहे.

इंदापूर शहरात बुलेट गाडीपेक्षा सायकल चालवण्यावर भर झोपडीतल्या माणसापासून ते श्रीमंत कुटुंबापर्यंत दिलेला दिसतो. याचे सर्व श्रेय नगर परिषदेच्या उपक्रमाला जात आहे. शहरातील युवक व वृद्धांची आरोग्य सुस्थितीत जपण्याची संकल्पना या सायकल ट्रॅकच्या माध्यमातून पुढे आली आहे.

इंदापूर नगरपालिका अनेक पुरस्कारांचे मानकरी
इंदापूर शहरातील सर्व पूरक घटकांमध्ये सुविधा पोहचविल्या आहेत. उत्कृष्ट कार्यामुळे इंदापूर नगरपरिषदेस आणि नगराध्यक्षा अंकिता शहा यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.स्वच्छता अभियान अंतर्गत इंदापूर नगरपरिषद सलग तीनवेळा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. थ्री स्टार दर्जा असलेले मानांकन इंदापूर नगरपरिषदस प्राप्त झाले आहे.तसेच नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांना नारीशक्‍ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवदुर्गा, दैनिक “प्रभात’चा नारी सन्मान आदी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

पुरस्कारमय नगराध्यक्षा म्हणून त्यांचा लौकीक जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळे नगरपरिषद स्थापन झाल्यापासून नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या कालावधीमध्ये सन्मान नगरपालिकेला मिळाला आहे,मिळत आहे. इंदापूर शहरात सर्व नागरिकांना पायाभूत सुविधा देताना सर्वकष आराखडा तयार केला आहे. कोणताही घटक यापासून वंचित राहता कामा नये, यासाठी काटेकारपणे नियोजन केले आहे. प्रशासनातील अधिकारी आणि लोकसहभाग यांच्यात दुवा साधत नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.

करोना महामारीत उत्कृष्ट व्यवस्थापन
जगावर घोंगावलेल्या करोना महामारीचे संकट इंदापूर शहरावर आले. परंतु नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा आणि नगरसेवकांचे कार्य मोठे आहे.लॉकडाऊन काळात अनेक कुटुंबाला अन्नधान्य किट उपलब्ध करून दिले. शहरामध्ये करोनाविरुद्ध लढण्यासाठी जनजागृती केली. नगरपालिकेच्या प्रशासनाच्या पाठीशी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी ठामपणे उभे राहून नव्हे तर त्यांच्या बरोबरीने कार्य केले.
करोना सेंटर, करोना निर्मूलन सर्व्हेक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. नागरिकांच्या व नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सुख- दुःखात उभे राहून त्यांना पाठबळ देण्याचे काम केले आहे. त्यामुळे शहरवासीयांना आपल्या कुटुंबातीलच नगरपालिका असा विश्‍वास नगराध्यक्षा शहा यांनी इंदापूरकरांचा संपादन केला आहे.

चार्जिंग स्टेशनची उभारणी
इंदापूर शहरात एकीकडे विकासकामे करीत असताना पर्यावरणाचा समतोल ढळू दिला नाही. त्यामुळे शहरात विकासकामे आणि पर्यावरणाची पायाभरणी एकाचवेळी होत आहे. त्यामुळे इंदापूर शहरावर हिरवाईचा शालू पांघरला आहे. पर्यावरणपूरक उपक्रमासाठी तसेच वाढते प्रदूषण टाळण्यासाठी आणि पर्याय इंधन व्यवस्थे संदर्भात इंदापूर नगरपरिषदेने इलेक्‍ट्रिकल मोटर सायकलसाठी मोफत चार्जिंग स्टेशनची निर्मिती केली आहे.

सेलेब्रिटींना पर्यावरणाची भुरळ
डॉ. अविनाश पोळ तसेच सयाजी शिंदे यांनी नगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमास तसेच अटलघन या ऑक्‍सिजन पार्कला त्यांनी भेट दिली. नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या पर्यावरणपूरक आणि विकासाभिमुख रचनात्मक कार्याचे मुक्‍तकंठाने कौतुक केले आहे. हीच पोचपावती अंकिता शहा यांच्या कार्याची आहे.

विद्यार्थी- विद्यार्थिनींचा सहभाग
शहरातील वृक्षारोपण यशस्वी होण्यासाठी आय कॉलेजचे विद्यार्थी, माध्यमिक शिक्षण घेत असणारे विद्यार्थी यांचेदेखील हात या माझी वसुंधरा अभियानाला सातत्याने लागत आहेत. वृक्षांची लागवड यशस्वी होत आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग हा पर्यावरणाला चालना देणारा ठरत आहे.

पर्यावरणाची जाणीव
इंदापूर शहरातील जे मुख्य रस्ते आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नगरपरिषदेने दुतर्फा तब्बल दहा हजार झाडे अनोख्या पद्धतीने वृक्षारोपण करीत वाढवली आहेत. नगरपरिषदेने केलेले वृक्षारोपण चिरकाल टिकावे, यासाठी शहरवासीयांना विश्‍वासात घेऊन अधिकारी वर्गाला सोबत घेऊन वृक्ष जपण्याची शपथ घेऊन वृक्ष लागवड केली जाते. त्यामुळे लावलेले वृक्ष जगतात आणि टिकतात.

205 दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन
बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये हिरडा, बेहडा, आवळा, तुसळ, अश्‍वगंधा, अडुळसा, शतावरी, कोरफड, चंदन, पर्णकुटी, गवती चहा, मारवा यासारख्या देशी 205 वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. पार्कची माध्यमातून वेगवेगळे कीटक, पक्षी आकर्षिली जाऊन जैवविविधता वाढीस लागेल. इतर प्राण्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी या परिसराला कुंपण नगरपरिषद करीत आहे.

शब्दांकन : नीलकंठ मोहिते, इंदापूर तालुका प्रतिनिधी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.