उच्चशिक्षित सरिता इंदलकर यांच्या मनात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची तळमळ होती. महिलांच्या व्यथा जाणून घेत त्यांना आधार देण्यासाठी त्या पुढाकार घेऊ लागल्या. समाजकारण करताना पतीच्या साह्याने त्यांना राजकारणाची साथ मिळत गेली. राजकीय व्यासपीठाचा उपयोग सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी होऊ लागला. सभापती आपल्या दारी यासारखा उपक्रम सुरू करून गावांच्या अडचणी त्यांनी जाणून घेण्यास सुरवात केली. महिलांचे सबलीकरण आणि ग्रामीण भागाचा विकासाचा ध्यास घेन त्यांची वाटचाल जिद्दीने सुरू आहे…
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सौ. सरिता इंदलकर यांनी परिश्रमाने उच्च शिक्षण घेतले. कसलाही राजकीय वारसा नसताना सातारा तालुका पंचायत समितीचे सभापतिपद त्यांना मिळाल्याने या संधीचे सोने करत महिला कुठेही कमी पडत नसल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. गोरगरीब, निराधार, दिव्यांग, अंधांना आधार देत महिलांचे संघटन करुन त्यांना उर्जा देण्याचे काम गृहिणी ते सभापती या माध्यमातून सौ. सरिता इंदलकर यांनी केले आहे.
सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता संभाजी इंदलकर यांचा जन्म कुडाळ (बामणोली) येथे शेतकरी कुटुंबात झाला. बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर कळंबे (ता. सातारा) येथील संभाजी इंदलकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संभाजी इंदलकर यांना समाजकार्याची आवड होती. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणूनही त्यांची तालुक्यात ओळख होती. इंदलकर यांनी गावचे उपसरपंचपद भूषवले. याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाचे तालुका समन्वयक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सौ. सरिता इंदलकर या उच्चशिक्षित असल्याने गोरगरिबांचे प्रश्न सुटले पाहिजेत, निराधारांना आधार दिला पाहिजे, यासाठी त्यांची नेहमीच तळमळ होती.
महिलांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना आधार देण्याचे काम त्यांनी केले. पंचायत समितीच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सौ. सरिता इंदलकर मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या. नुकत्याच झालेल्या सभापतिपदाच्या निवडीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी सौ. इंदलकर यांना सभापतिपदाची संधी दिली.
सभापतिपदाची संधी मिळाल्यानंतर अंगणवाडीतील अंध मुलील दत्तक घेऊन सौ. इंदलकर यांनी पदभार स्विकारला. एवढेच नव्हे तर पहिल्या मानधनाचा धनादेश संबंधित मुलीला सुपूर्द करुन सामाजिक बांधिलकी जोपासली. आकले (ता. सातारा) येथे कातकरी वस्तीत जाऊन तेथील समाजबांधवांसमवेत वाढदिवस साजरा करुन कातकरी समाजबांधवांना एका वर्षात घरकुले बांधून देण्याची ग्वाही दिली. त्याबाबतचा पाठपुरावाही प्रत्यक्ष सुरु केला. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलेली संधी सार्थकी लावण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कृतीतून केला आहे.
तालुक्यातील 194 गावांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी “सभापती आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला. मकर संक्रांतीनिमित्त पंचायत समितीत हळदी-कुंकू समारंभ घेऊन महिलांना संघटित करण्याचा प्रयत्न केला. कातकरी समाजातील मुले शिकली पाहिजेत, त्यांना हक्काची घरे मिळाली पाहिजेत, यासाठी आता सौ. इंदलकर यांनी पुढाकार घेतला आहे.
महिला संघटित झाल्या पाहिजेत, त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत यासाठी सौ. सरिता इंदलकर यांनी नेहमीच पुढाकार घेत आहेत. महिला दिनी (दि. 8 मार्च) डिजीटल साक्षरता अभियान राबवून महिलांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महिलांची हिमोग्लोबिन व आरोग्य तपासणी करुन त्यांच्या आरोग्य विषयक शंकांचे निराकरण करण्याचा प्रयत्न सौ. इंदलकर यांच्या माध्यमातून होणार आहे. आगामी काळातही आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस सौ. इंदलकर यांनी व्यक्त केला आहे.