“आरोग्य सेवाही ईश्वर सेवा’ मानून काम करणारे डॉक्टर हे करोना महामारीच्या काळात खऱ्या अर्थाने ईश्वरी अवतारच ठरले, असे म्हंटलेतर वावगे ठरणार नाही. चरेगाव, ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. अश्विनी शेवाळे यांनी आपल्या टीमसह स्वतःला आरोग्य सेवेत झोकून दिले. येथे करोनाचा सापाडलेल्या पाहिल्या रूग्णापासून आजअखेर त्या विभागातील नागरिकांच्या आरोग्यची बारकाई काळजी घेत आहेत.
एका सर्वसामान्य ग्रामीण कुटुंबात वाढलेली ही मुलगी कृष्णा विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेऊन पुढे वैद्यकीय सेवेत सक्रीय झाली आहे. प्राथमिक शिक्षण शेवाळेवाडी. नेताजी सुभाषचंद्र विद्यालय येळगाव येथे माध्यमिक शिक्षण तर परिस्थिती गरीबीची असल्याने रद्दीत आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांची वही तयार करून शिक्षण घेतले. दहावीला 80 टक्के गुण मिळाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्नं उराशी बाळगले.
मात्र, घरच्या गरिबीमुळे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी डोनेशन भरण्यासाठी पैसे नव्हते. अशात काही हितचिंतकांनी मदत केली आणि कृष्णा विद्यापीठातून वैद्यकीय जीवनाचा श्रीगणेशा झाला.
खुप खडतर प्रवासातून त्यांनी अखेर यशस्वीरीत्या शिक्षण पूर्ण केले. सध्या डॉ. शेवाळे या उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत चरेगाव येथील उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या खडतर प्रवासाला सलाम…! आज महिला दिनी त्यांना खुप खुप शुभेच्छा…!