मेरठ- हायप्रोफाईल व्यापाऱ्याने स्वतःच्या कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर व्यापाऱ्याच्या पत्नीने सु्द्धा गळा कापून घेतला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठ येथे घडली आहे.
अमित बन्सल असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव असून पिंकी बन्सल पत्नीचे नाव आहे. अमित हे मेरठमध्ये लोकप्रिय इंटिरिअर डिझायनर आणि पीओपीचे व्यापारी होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, नेहमीप्रमाणे कार्यालयात आलेल्या अमित बन्सल यांनी तिथे गळफास लावून आत्महत्या केली. अमित यांच्यापाठोपाठ काही वेळाने त्यांची पत्नी पिंकी कार्यालयात आली. पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी लगेचच पेपर कटरने स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना दिसताच त्यांनी पिंकी यांना रुग्णालयात हलविले. पिंकी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती नाजूक आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासास सुरुवात केली त्यामध्ये पोलिसांना अमित यांनी तणावात हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. पुढिल तपास पोलिस करत आहेत.