हर्षद कटारिया
बिबवेवाडी – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे “दादा’ अजित पवार गटाने भाजप पक्षाशी जुळुवून घेत उपमुख्यमंत्री पद व मंत्री पदे मिळवली.
भाजपशी जुळवत घेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पवार यांनी उपमुख्यमंत्री पद तसेच मंत्री पदं मिळवली असले तरी पुण्यात भाजप विरोधात असलेले अजित पवार यांचे कार्यकर्ते तसेच महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार हे मात्र भाजपशी जुळवून घ्यायचे की विरोधी भूमिका ठेवायची याबाबत अद्यापही “कन्फ्युज’ आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. पुण्यावर विशेष प्रेम असलेल्या पवारांनी अनेक वेळा पुण्याचे पालकमंत्री पद भूषवले आहे. तसेच, विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी भाजपला “टार्गेट’ही केले आहे. परंतु, येणारी महापालिका निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप तसेच शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे गटांत अशीच “महायुती’ राहिली तर ज्यांच्या विरोधात आजपर्यंत भूमिका ठेवली त्यांच्याच सोबतच येत्या निवडणुकीत जुळवून घ्यावे लागणार आहे. परंतु, यातून मतांचे विभाजन होण्याचा मोठा धोका आहे.
पर्वती मतदारसंघात अनेक प्रभागात भाजपचे तुल्यबळ उमेदवार असले तरी अजित पवार गटाचे अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अनेक मातब्बरही इच्छुक आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग कसे पडणार, आपले तिकीट कसे “कन्फर्मट होणार, कोणत्या उमेदवारांना सोबत घेतल्यास ताकत वाढेल याची गणिते आखली जात आहेत.
“स्टॅंडिंग’ नगरसेवकांची तिकिटे पक्की?
भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने पवार किंवा शिंदे हे सोबत असले तरी भाजपच्या “स्टॅंडिंग’ नगरसेवकांची तिकिटे पक्की आहेत, अशी प्रतिक्रिया दिल्याने आता महापालिका निवडणूक “महायुती’ने एकत्र लढली तरी राजकीय देवाणघेवाणमध्ये अव्वल असलेले पवार आपल्या उमेदवारांसाठी किती तिकिटे मिळवतील, हे पाहावे लागेल. दुसरीकडे अजित पवार यांच्याशी तिकिटाबाबत जुळवून घेत, भाजप नेत्यांना न दुखावता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी लागणार आहे, त्यासाठी शिंदे किती जागा घेणार हे ही महत्त्वाचे ठरणार आहे.