पुणे -पुणे-लातूर या मार्गावर रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे. तुलनेने वर्षानुवर्षे मागणी करूनही गर्दीच्या काळात जादा ट्रेन सोडली जात नाही. पण, आता या मार्गावरील प्रवाशांची चिंता दूर होण्याची शक्यता असून, पुणे-लातूर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
सध्या पुणे येथून लातूरला जाण्यासाठी मुंबई-पुणे-लातूर-बिदर एक्स्प्रेस, पनवेल-नांदेड एक्स्प्रेस या ट्रेन रात्री सुटतात. तर, हैदराबाद एक्स्प्रेसआठवड्यातून तीन दिवस हडपसर टर्मिनस येथून दुपारच्यावेळी सुटते. पुणे-अमरावती एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस तीदेखील रात्रीच धावते. त्यामुळे दिवसा जाण्यासाठी या मार्गावर ट्रेन उपलब्ध नाही. सध्या धावणाऱ्या या सर्वच ट्रेन्सना खूपच गर्दी असते. दोन-दोन महिने आधी तिकीट बुकिंग करूनही कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यामुळे लातूरला जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
दरम्यान, या मार्गावर सोलापूर किंवा मुंबईप्रमाणे इंटरसिटी ट्रेन सुरू करावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहे. त्यावर आता रेल्वे प्रशासनाने मुख्यालयाकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. असे झाल्यास पुणे-दोैंड-कुर्डुवाडी यांसह बार्शी, धाराशिव आणि लातूर या मार्गावर प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
वेळापत्रकही ठरले?
मुख्यालयाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास पुणे स्थानकातून दररोज सकाळी सात वाजता लातूरसाठी ट्रेन रवाना होणार आहे. दुपारी एक वाजता ती लातूर येथे दाखल होईल. त्यानंतर लातूरवरून दुपारी दोन वाजता पुण्यासाठी रवाना होऊन सायंकाळी 8 वाजता पुण्यात येईल, असे रेल्वे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.