मुंबई : मुंबई विमानतळावर एका गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अभिषेक बाबू असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते विमानतळावरील इमिग्रेशन विभागात ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर अर्थात कनिष्ठ गुप्तचर अधिकारी म्हणून कार्यरत होते.
अभिषेक बाबू यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पी-4 भागातील पार्किंगच्या इमारतीवरुन सकाळी उडी मारली. यात ते गंभीर जखमी झालेल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अभिषेक बाबू यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशीकांत माने यांनी दिली.
दरम्यान, अभिषेक बाबू यांच्या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली. पार्किंगमधून उडी मारल्यानंतर नेमकं काय घडले हे काहीवेळासाठी कोणालाच कळले नाही.
थोड्याच वेळानंतर कोणीतरी इमारतीवरुन उडी मारल्याचे समोर आले. पण त्यांची ओळख पटली नव्हती. अधिक चौकशीनंतर उडी मारणारी व्यक्ती हा ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर अभिषेक बाबू असल्याचे स्पष्ट झाले.