नवी दिल्ली- भारतीय नौदलाचे तारिणी हे नौकानयन जहाज सुमारे दोन महिन्यांची ऐतिहासिक महासागर मोहिम यशस्वीपणे पार पाडून रविवारी गोव्यात परतली. या मोहिमेचे नेतृत्व भारतीय नौदलाच्या महिला अधिकारी लेफ्टनंट कमांडर डिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए यांनी केले. या मोहिमेला २८ फेब्रुवारी रोजी कमांडर अभिलाष टॉमी (निवृत्त) यांनी गोव्यातून हिरवा झेंडा दाखवला होता.
हिंद महासागरातील अंदाज लावण्यास कठीण अशा २२ दिवसांच्या जलप्रवासानंतर, आयएनएसवी तारिणी २१ मार्च रोजी मॉरिशसमध्ये पोर्ट लुईस येथे पोहोचली. याठिकाणी या मोहिमेतील अधिकाऱ्यांना मॉरिशस तटरक्षक दल आणि भारतीय उच्चायुक्तालयातील सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि दोन्ही सागरी राष्ट्रांमधील सद्भावना वाढवणे, या उद्देशाने सौहार्द आणि सहकार्याचे प्रतीक म्हणून, जहाजाने मॉरिशस तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांसह एक प्रशिक्षण कार्यक्रम देखील हाती घेतला होता.
पोर्ट लुईस नंतर लेफ्टनंट कमांडर डिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा हे अधिकारी 30 मार्च रोजी परतीच्या प्रवासाला निघाले. त्यावेळी या अधिकाऱ्यांना सातत्याने सोसाट्याचा वारा, खवळलेला समुद्र आणि इतर आव्हानांचा सामना करावा लागला.
त्यांची दुर्दम्य जिद्द आणि दृढ संकल्प यामुळे सर्व संकटांवर मात करत आय एन एस वी तारिणीचे २१ एप्रिल रोजी गोव्याला आगमन झाले.
या मोहिमेदरम्यान आलेल्या संकटांनी खचून न जाता, या महिला अधिकाऱ्यांनी साहसी आणि शोध घेण्याच्या जिज्ञासेला मूर्त स्वरूप देत, अपवादात्मक नौवहन कौशल्य आणि लवचिकतेचे दर्शन घडवले.
आता या दोन्ही अधिकारी या वर्षी सप्टेंबरमध्ये आयएनएसवी तारिणीवरून जगभराची परिक्रमा या आपल्या पुढील ऐतिहासिक सागरी प्रवासाची तयारी करत आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी भावी पिढीला विशेषतः भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांना नौवहनातील आव्हानात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा देईल.