पालिकेची तपासणी पथके कागदावरच?

तीन दिवस झाले पण कारवाई नाहीच

 

पुणे – शहरातील व्यवसाय तसेच सोयीसुविधा नागरिकांसाठी पुन्हा सुरू करतानाच या व्यावसायिक आस्थापनांना करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. मात्र, व्यावसायिकांकडून त्यास हरताळ फासला जात असल्याने शहरात करोनाचे रुग्ण वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी तीन दिवसांपूर्वी 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर कारवाईसाठी 15 पथके नेमली आहेत. मात्र, या पथकांनी अद्याप कारवाईच सुरू केली नसल्याचे समोर आले आहे. याबाबतचा कोणताही अहवाल महापालिका प्रशासनाकडे नसल्याचे समोर आले आहे.

देशभरात लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत ज्या व्यवसायांना केंद्र व राज्य शासनाकडून परवानगी देण्यात येत आहे. त्यांना महापालिकेकडून गर्दी टाळणे, ग्राहकांची आरोग्य तपासणी करणे, थर्मामीटर, ग्राहकांचे नाव आणि संपर्क क्रमांक, ग्राहकांसाठी सॅनिटायझरची सुविधा, ठराविक वेळेनंतर दुकान व्यावसायिक अस्थापनेचे निर्जंतुकीकरण करणे असे नियम घालून दिले आहेत.

मात्र, व्यावसायिक अस्थापनांकडून या नियमांना हरताळ फासला जात असून कोणतेही नियम पाळले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तर हे नियम न पाळणाऱ्यांची महापालिकेकडून तपासणीही करण्यात येत नव्हती. ही बाब दैनिक “प्रभात’ने “महापालिका देतेय करोनाला’ निमंत्रण या वृत्ताद्वारे उजेडात आणली होती. त्याची गंभीर दखल घेत 24 नोव्हेंबर रोजी 15 क्षेत्रीय कार्यालयांची 15 पथके स्थापन करण्याचे आदेश काढले. त्यात 2 महापालिकेचे आरोग्य निरीक्षक, तर 2 स्थानिक पोलिसांचा समावेश आहे. मात्र, या पथकांकडून कारवाई सुरू करण्यात आली का, आली असेल तर किती आस्थापनांवर कारवाई केली, कारवाई झाली नसेल तर अद्याप का सुरू झालेली नाही अशी कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.