पुणे – मरणासन्न अवस्थेत असलेली मुठा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाच्या अनुदानातून आणि जायकाकडून अल्प व्याजदराने 990 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन नदी सुधारणा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत महापालिकेकडून 11 नवीन सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारली जाणार असून त्यातील दहा प्रकल्पांचे कामही प्रत्यक्षात सुरू करण्यात आले आहे.
या कामाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा उपाय योजना तसेच कामाचा आढावा घेण्यासाठी जायकाच्या दोन प्रतिनिधींनी पुण्यात येऊन पाहणी केली. या पाहणीनंतर सुरक्षा उपाय योजनांबाबत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. या प्रतिनिधींनी डॉ. नायडू रूग्णालय, भैरोबानाला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करत आवश्यक असलेल्या सुरक्षेच्या उपाय योजना कामाच्या ठिकाणी करण्याच्या सूचना केल्या.
या प्रकल्पासाठी जायका 85 टक्के खर्च करणार असून महापालिका उर्वरित खर्च करणार आहे. या निधीतून शहरातील आंबिल ओढा, भैरोबा नाला, माणिक नाला व कोथरूड, वारजे आणि हडपसर नाला या सहा प्रमुख ओढ्या-नाल्यांमधून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी विठ्ठलवाडी, नायडू (जुना), नायडू (नवीन), भैरोबा नाला, मुंढवा, खराडी, तानाजीवाडी, बोपोडी, बाणेर, कोथरूड या 10 ठिकाणी एकूण प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे.