कोपर्डे हवेली/उंब्रज, दि. 12 (प्रतिनिधी) -कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बोराटे (रा. शिरवडे, ता. कराड) यांचा मुलगा आयुष यांचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या प्रीतम चंद्रकांत पाटील (वय 31), सागर अशोक पवार (वय 35), किरण मोहन पवार (वय 31, रा. वहागाव, ता. कराड) व हृषिकेश अशोक पाटील (वय 22, रा. येणके, ता. कराड) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्याकडून कुऱ्हाड, कोयता, चाकू अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. हा कट मंगळवारी (दि. 11) मध्यरात्री पोलिसांनी उघडकीस आणला. या कटाची कबुली संशयितांनी दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रीतम पाटील हा बेलवडे हवेली येथे आनंद नावाचे हॉटेल चालवतो. त्या हॉटेलमध्ये आयुष बोराटे हा शुक्रवारी (दि. 7) जेवायला गेला होता.
त्यावेळी आयुष व प्रीतम यांच्यात जेवणाच्या ऑर्डरवरुन वाद झाला होता. त्यानंतर आयुषने त्याचा भाऊ वेदांत आणि बाळू यादव यांना बोलावून घेतले होते. त्यांनी हॉटेलमध्ये तोडफोड आणि दुचाकीची मोडतोड केली होती. त्याचा राग मनात धरून प्रीतमने सागर पवार, किरण पवार, हृषिकेश पाटील या मित्रांना सोमवारी (दि. 10) हॉटेलमध्ये बोलावून घेऊन, आयुषच्या खुनाचा कट रचला. त्यांनी हॉटेलमधील कुऱ्हाड, चाकू, कोयता घेतला. दुचाकीचा नंबर कोणाला दिसू नये म्हणून, नंबप्लेटला राख व माती लावली. त्यानंतर ते दुचाकीवरुन काल (दि. 11) मध्यरात्री दोन वाजता शिरवडेकडे निघाले. त्यावेळी तळबीड पोलीस ठाण्याच्या महिला हवालदार वाघमारे व वाहनचालक पोलीस कॉन्स्टेबल पाटील हे रात्रगस्तीवर होते.
त्यांना हे चौघे बेलवडे हवेलीच्या हद्दीत दिसले. हवालदार वाघमारे यांना संशय आल्याने, त्यांनी संशयितांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना न जुमानता संशयित भरधाव दुचाकीवरून पुढे गेले. त्यानंतर पोलिसांनी संशयितांची दुचाकी तासवडे टोलनाक्याजवळ औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर अडवली. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आयुषच्या खुनाच्या कटाची कबुली त्यांनी दिली. संशयितांनी महामार्गाकडेला टाकलेली हत्यारे आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी सपोनि राहूल वरोटे करत तपास करत आहेत.