पिंपरी – शहरातील वायुप्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रदुषणाला आळा घाण्यासाठी महापालिकेने पिंपरी-चिंचवडमधील विविध भागातील एकूण १७ चौकांमध्ये एअर प्युरिफिकेशन फाउंटेन ही यंत्रणा उभारण्यात येत आहेत. त्याद्वारे हवेत पाण्याचे तुषार सोडल्यानंतर धुळीकण पाण्याबरोबर खाली कोसळून हवेतील प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका दिल्लीच्या धर्तीवर नवीन संकल्पना राबवित आहे. वायू व जल प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून नवनवीन संकल्पना राबविल्या जातात. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत (एनसीएपी) शहरातील १७ चौकांत १२ ड्राय मिस्ट टाईप वॉटर फाउंटन आणि ९ ठिकाणी एअर प्युरिफीकेशन फाउंटन उभारण्याचे काम सुरु आहे.
या यंत्राद्वारे दर दहा मिनिटांनी पाण्याचे तुषार हवेत फवारले जात आहेत. हवेतील धुळीकण जड होऊन खाली बसतात. चौकांच्या चारी रस्त्यांवर हे आकर्षक रचनेतील फाउंटन बसविण्यात येत आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी त्याखाली ५०० ते १ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली अहे. या कामासाठी ३ कोटी ९० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाने दिला आहे. एअर प्युरिफीकेशन उभारण्याचे काम शहरात अंतिम टप्प्यात आले आहे.
शहरात मुव्हेबल फॉग कॅनन डस्ट सप्रेशन ही पाच वाहने कार्यरत झाली आहेत. पाण्याच्या टँकरप्रमाणे असलेली ती पाच वाहने रस्त्यांवर फिरून पाण्याचे तुषार उडवित आहेत. तसेच, मोशी कचरा डेपोतील बांधकाम राडारोडा प्रकल्पात एक कोटी खर्च करून डस्ट सप्रेशन यंत्रणा बसविली जाणार आहे.
रोड वॉशरद्वारे रस्ते धुणार
क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आठरा मीटर रुंदीचे रस्ते स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने विशेष यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. यांत्रिक पध्दतीने आठवड्यातून एकदा रस्ते पाण्याने स्वच्छ केले जाणार आहेत. त्यासाठी रोड वॉशऱची दोन वाहने वापरली जात आहेत. यासह एकूण आठ वाहने खरेदी करण्यासाठी १ कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
या चौकांची निवड
पिंपरी चौक, भोसरी चौक, खंडोबा माळ चौक, नाशिक फाटा, चिंचवड स्टेशन, कस्पटे चौक, होळकर चौक, नेहरूनगर चौक, चिखली आरटीओ चौक, चिंचवड गाव चौक, रावेत-भोंडवे चौक, मोशी गोदावून चौक, रांका गॅस स्टेशन, विसर्जन घाट चौक, कोकणे चौक, तळवडे चौक, एम. एम. स्कूल चौक.