नवी दिल्ली – एप्रिल महिन्यातील पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता कमी होऊन 2.6 टक्के झाली आहे. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीजनिर्मिती याचा या क्षेत्रात समावेश असतो. गेल्या वर्षी एप्रिल मध्ये या क्षेत्राचा विकासदर 4.7 टक्के होता. यंदा तो या पातळीच्या जवळपास निम्म्यावर आला आहे.
खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील लक्षणीय चढ-उतार यामुळे देशांतर्गत नैसर्गिक वायू आणि खतनिर्मिती क्षेत्रावर झालेला विपरीत परिणाम हा मुख्यत: पायाभूत क्षेत्राच्या नकारात्मक कामगिरीत दिसून आला आहे. कोळसा उत्पादनात वाढीचा दर सरलेल्या एप्रिलमध्ये केवळ 2.8 टक्के राहिला असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. खतनिर्मिती, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांच्या उत्पादनाचा दर एप्रिलमध्ये नकारात्मकच होता.