पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम दि. 5 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास 1 ते 19 जुलै अशी मुदत आहे. हा अभ्यासक्रम तीन महिने मुदतीचा असून याद्वारे विद्यार्थ्यांना अर्धवेळ उत्पन्नाचे साधन त्यातून मिळवणे शक्य होणार आहे.
विद्यापीठाच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे प्रवेश होत आहे. यावर्षी ह्या अभ्यासक्रमाची पाचवी बॅच आहे. अभ्यासक्रमासाठी पहिले प्राधान्य विद्यापीठातील नियमित विद्यार्थ्यांना दिले जाईल. त्यानंतर जागा शिल्लक राहिल्यास बाहेरील व्यक्तींनाही तसेच विदेशी विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू शकेल. या अभ्यासक्रमाचे शुल्क 5 हजार 155 रुपये आहे. प्रवेशाची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अभ्यासक्रम मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत असेल. अभ्यासक्रमाची वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 6 अशी आहे. 18 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्तीही प्रवेशासाठी पात्र राहतील. मात्र, किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. दीपक माने यांनी दिली.
जिम व्यवस्थापन अभ्यासक्रमही सुरू
विद्यापीठातर्फे जिम शिक्षक व व्यवस्थापन हा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही 5 ऑगस्टपासून सुरू होत आहे. यासाठी 1 ते 19 जुलै अशी अर्ज करण्यासाठी मुदत आहे. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रमही तीन महिने मुदतीचा असून त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेची माहिती
नियमित विद्यार्थी, बाहेरच्या व्यक्ती, विदेशी व्यक्तींना प्रवेश
अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकावर सर्वाधिक भर
व्यावसायिक योग प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी
ऑगस्ट 5 पासून सुरू होणार
अभ्यासक्रमाची क्षमता 50 विद्यार्थी
विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळणार
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश