नवी दिल्ली – करोनाच्या उद्रेकामुळे मे महिन्यात आठ पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता वाढण्याऐवजी तब्बल 23.4 टक्क्यांनी कोसळली आहे. मे महिन्यामध्ये फक्त खत क्षेत्र वगळता इतर आठ क्षेत्रांत उत्पादन झाले नाही. त्यामध्ये कोळसा, क्रूड तेल, नैसर्गिक वायू, तेल शुद्धीकरण, पोलाद, सिमेंट आणि वीज क्षेत्राचा समावेश आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये या क्षेत्राची उत्पादकता 3.2 टक्क्यांनी वाढली होती. पायाभूत सुविधा क्षेत्राच्या आधारावर इतर औद्योगिक उत्पादन होते. त्यामुळे मे महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादनही याच प्रमाणात कमी होणार असल्याचे गृहीत धरले जाऊ लागले आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात मिळून या क्षेत्राची उत्पादकता 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते. त्यामुळे या क्षेत्रातील कामकाज होऊ शकले नाही. पायाभूत सुविधा क्षेत्राचा एकूण औद्योगिक उत्पादनांमध्ये 40.27 टक्के वाटा असतो. त्यामुळे लवकरच जाहीर होणाऱ्या औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी निराशाजनक राहणार आहे.