NPS : निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य सुरक्षित करण्यासाठी अनेकजण आर्थिक गुंतवणूक करत असतात. आर्थिक गुंतवणूकीचे विविध पर्याय आहेत. या पर्यायामधील अधिक सुरक्षित आणि अधिक चांगला पर्याय म्हणून राष्ट्रीय पेन्शन प्रणाली योजनेकडे पाहिले जाते.
केंद्र सरकारने 1 जानेवारी 2004 रोजी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) सुरू केली आहे. सुरुवातीला फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेली ही योजना नंतर सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आली. या योजनेत वयाच्या 18 व्या वर्षापासून भाग घेता येतो. यामुळे तुमचे पैसे वाढण्यास अधिक वेळ मिळतो आणि तुम्हाला सेवानिवृत्तीसाठी मोठा निधी जमा करता येतो.
9 ते 12 टक्के परतावा –
एनपीएस ही दीर्घकालीन योजना आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे ही योजना चालवले जाते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती पात्र आहे. वयाच्या 60 वर्षानंतर, NPS मध्ये जमा झालेल्या रकमेपैकी 60 टक्के रक्कम एकरकमी काढता येते. तर उर्वरित 40 टक्के रक्कम अॅन्युइटीमध्ये गुंतवावी लागते. हा पैसा पेन्शन देण्यासाठी वापरला जातो. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) योजना 9 ते 12 टक्के परतावा देते.
एनपीएसमध्ये, आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट आणि कलम 80CCD1(B) अंतर्गत 50 हजार रुपयांची सूट दिली जाते. तसेच यामध्ये मिळणारी रक्कम करमुक्त आहे.
सेवानिवृत्तीनंतर दरमहा 50 हजार रुपये पेन्शन कशी मिळेल?
NPS कॅल्क्युलेटरनुसार, जर 25 वर्षांच्या व्यक्तीने 60 वर्षांपर्यंत एनपीएसमध्ये दरमहा 6,531 रुपये गुंतवले तर, त्याला 60 वर्षांनंतर दरमहा 50,005 रुपये पेन्शन मिळेल. या कालावधीत संबंधित व्यक्ती 27,43,020 रुपयांची गुंतवणूक करेल, ज्यामुळे 2,50,02,476 रुपयांचा निधी जमा होईल. यामध्ये त्याला 2,22,59,456 रुपये नफा मिळेल.