‘या’ 6 राज्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा शिरकाव; हरियाणात 2 दिवसात 33 हजार कोंबड्यांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशात करोनाचे संकट कायम असताना आता बर्ड फ्ल्यूचा संसर्ग वाढत असल्याने नवीन संकट उभे राहिले आहे. देशात केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूने शिरकाव केला आहे. याबाबत केंद्र सरकारकडून पृष्टी देण्यात आली आहे.

हरियाणातही बर्ड फ्ल्यूचा विषाणू दाखल झाला असून भोपाळमधील एका प्रयोगशाळेत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या ठिकाणी पाठवण्यात आलेल्या तीन पैकी दोन नमुन्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी पंजाबमधील जालंधर येथील प्रयोगशाळेतून अहवाल निगेटिव्ह आला होता.

हरियाणाच्या पंचकुला येथील बरवाला रायपूरराणी पोल्ट्री फार्मच्या व्यावसायिक क्षेत्रात दोन दिवसांत 33 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळेच हा आकडा वाढून 4.33 लाखांवर पोहोचला आहे.

तर दुसरीकडे पशुपालन विभागाने परिस्थिती पाहता आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. विभागाकडून सातत्याने जनजागृती केली जात आहे. पोल्ट्री उत्पादने कमीत कमी 70 डिग्री तापमानावर उकडून खावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पशुपालन विभागाचे डॉ. नरेंद्र ठकराल म्हणाले, पंचकुलामध्ये पोल्ट्री फार्ममध्ये 80 लाख कोंबड्या आहेत. सध्या कोंबड्या मृत्यूच्या घटना पंचकुलामध्येच समोर आल्या आहेत. या आजाराचा फैलाव रोखता यावा यासाठी जिल्ह्यात आवश्‍यक पावले उचलली जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.