चेन्नई – दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या बलाढ्य फलंदाजांना पदार्पणवीर अक्सर पटेल व अनुभवी रवीचंद्रन अश्विन यांनी सहज गुंडाळले व संघाला 317 धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत1-1 अशी बरोबरी साधली. दोन्ही डावांत मिळून 8 बळी व शतकी खेळी यांच्या जोरावर अश्विन सामन्याचा मानकरी ठरला.
भारताच्या या दोन्ही फिरकी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. विजयासाठी 482 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करणारा इंग्लंडचा दुसरा डाव केवळ 164 धावांतच संपला व भारतीय संघाने हा सामना 317 धावांनी जिंकला. पटेलने पाच बळी घेत दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजीची वाताहत केली.
पहिल्या डावात रोहित शर्माने केलेली वादळी दीडशतकी खेळी, अश्विनची अष्टपैलू कामगिरी आणि पटेलची अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात वर्चस्व गाजवले. पहिल्या डावांत रोहित शर्माच्या 161 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने 329 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात गोलंदाजी करताना अश्विनने पाच बळी घेतले तर, दुसऱ्या डावात तीन बळी मिळवत सामन्यात 8 बळी मिळवले. तसेच दुसऱ्या डावांत फलंदाजी करताना अश्विनने दमदार शतकी खेळी केली.
अश्विनसह सरस कामगिरी करताना पटेलने दुसऱ्या डावांत अचूक टप्यावर मारा करत पाच बळी घेण्याची किमया साधली. पटेलने पहिल्या डावांत दोन तर, दुसऱ्या डावांत पाच बळी घेत सामन्यात सात बळी मिळवले. कुलदीप यादवने 2 गडी बाद करत त्यांना योग्य साथ दिली. पहिल्या डावात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत व अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात कर्णधार विराट कोहलीने मोलाचा वाटा उचलताना अर्धशतकी खेळी केली.
दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला आपल्या दर्जाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटला दुसऱ्या सामन्यात साफ अपयश आले. भारतीय गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळीही करता आली नाही.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – सर्वबाद 329 धावा. इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 134 धावा. भारत दुसरा डाव – सर्वबाद 286 धावा. इंग्लंड दुसरा डाव – 54.2 षटकांत सर्वबाद 164 धावा. (मोईन अली 43, ज्यो रूट 33, रोरि बर्न्स 25, डॅनियल लॉरेन्स 26, अक्सर पटेल 5-60, रवीचंद्रन अश्विन 3-53, कुलदीप यादव 2-25).