बगदाद – इराकच्या उत्तरेकडील भागात असलेल्या अमेरिकेच्या तळाजवळील विमानतळाजवळ आज एक रॉकेट हल्ला झाला. त्यात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीचा एक कंत्राटदार ठार झाला आणि किमान 8 अन्य लोक जखमी झाले. इराक़ी सुरक्षा व्यवस्थेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
अर्ध स्वायत्त असलेल्या कुर्दिश प्रशासन असलेल्या इर्बिल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरामध्ये आणि जवळच अमेरिकेच्या सैन्याचा तळ असलेल्या भागात तीन रॉकेट डागली गेली. या रॉकेट हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.
अमेरिकेच्या तळावरील एक सुरक्षा रक्षक जखमी झाला, असे आघाडी सैन्याचे प्रवक्ते अमेरिकेच्या सैन्याचे कर्नल वायन मारोटो यांनी सांगितले. या रॉकेटमुळे काही वाहनांचे आणि मालमत्तेचेही नुकसान झाले. प्राथमिक तपासादरम्यान अन्य काही व्यक्तीही जखमी झाल्याचे समजते आहे.
ही रॉकेट इर्बिलच्या दक्षिनेकडील किरकुक प्रांताच्या सीमाभागातून डागण्यात आली होती. विमानतळाजवळच्या रहिवासी भागात ही रॉकेट पडली. इराकी अध्यक्ष बारहम सालेह यांनी या हल्ल्याचा निषेध केला.
या हल्ल्यानंतर गार्डियन्स ऑफ ब्लड ब्रिगेड नावाच्या दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. एकूण 24 रॉकेट डागली गेली होती. मात्र विमानतळाच्या सुरक्षा यंत्रणेने ही रॉकेट रोखली, असेही या गटाने म्हटले आहे.