मुंबई – आयएनएस इंफाळ ही स्टेल्थ गाईडेड मिसाईल विनाशिका आज मुंबईत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात दाखल करण्यात आली. नौदलात दाखल चार स्वदेशी विशाखापट्टणम श्रेणीतील विनाशिकांपैकी ही तिसरी विनाशिका असून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने ती तयार केली आहे.
ही विनाशिका म्हणजे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे एक दिमाखदार उदाहरण आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रात जलमेव यस्य, बलमेव तस्य या आमच्या तत्त्वाला आयएनएस इंफाळ बळ देईल, अणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. या जहाजाची लांबी १६३ मीटर, रुंदी १७ मीटर आणि वजन ७,४०० टन आहे आणि भारतात निर्मित सर्वात शक्तिशाली युद्धनौकांपैकी ही एक आहे. या विनाशिकेला एकत्रित गॅस आणि गॅस कॉन्फिगरेशनमध्ये चार शक्तिशाली गॅस टर्बाइन्सद्वारे ताकद देण्यात आली आहे आणि तिचा वेग ३० सागरी मैलांपेक्षा अधिक आहे.
अरबी समुद्रात मालवाहतूक जहाजावर झालेला ड्रोन हल्ला आणि लाल समुद्रातील जहाजांवर झालेल्या हल्ल्याचाही संरक्षण मंत्र्यांनी उल्लेख केला. भारत सरकारने हे हल्ले अतिशय गांभीर्याने घेतले असून नौदलाने गस्त वाढवली आहे. या हल्ल्यातील गुन्हेगारांना लवकरच कायद्यानुसार शिक्षा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
आत्मनीर्भरतेचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने…
संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने भारतीय नौदलाच्या अतुलनीय वचनबद्धतेचे एक तेजस्वी प्रतीक असल्याचा गौरव आयएनएस इंफाळला प्राप्त झाला आहे, असे नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांनी आपल्या भाषणात नमूद केले. आयएनएस इंफाळ राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचवणाऱ्या विविध मनसुब्यांना रोखेल. शत्रूला नेस्तनाबूत करेल आणि प्रतिकूल परिस्थितीत अतुलनीय निग्रह दाखवेल, असे ते म्हणाले.
इशान्य भारतातील शहराचे नाव प्रथमच युद्धनौकेला…
एखाद्या ईशान्य भारतातील शहराच्या नावाने नामकरण करण्यात आलेली आयएनएस इंफाळ ही पहिलीच युद्धनौका आहे. मणिपूरच्या राजधानीचे नाव या विनाशिकेला दिल्यामुळे या प्रदेशाचे आणि मणिपूरचे महत्त्व आणि योगदान अधोरेखित केले आहे. ही युद्धनौका नौदलात सहभागी होण्यापूर्वी या विनाशिकेने ब्राह्मोस क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली,यामुळे ही युद्धनौका शस्त्र-सज्ज झाली आहे.