न्यूयॉर्क : मेक्सिकोत बारमध्ये झालेल्या गोळीबारात नऊ जण ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सेंट्रल मेक्सिकोतील गुआनाजुआतोमध्ये हा गोळीबार झाला असून, यात ९ जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गटांमधील हिंसाचारात वाढ झाली असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे. दोन गटातील वादातूनच हा गोळीबार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पोलिसांनी घडलेल्या घटनेविषयी माहिती देताना, बुधवारी रात्री ९ वाजता एक गट हातात बंदुका घेऊन बारमध्ये घुसला होता. यावेळी त्यांनी बारमध्ये असणाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. या गोळीबारात पाच पुरुष आणि चार महिला ठार झाल्या.
एक महिला जखमी असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस आणि प्रशासन याप्रकरणी तपास करत असून त्यांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी गुन्हेगारी गट असल्याचा संकेत देणारी दोन पोस्टर्स आढळली असल्याचे काहींनी म्हटले आहे.