पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्तीचा करण्याचे नुकतेच संकेत दिले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सर्व शाळांत मराठी विषय सक्तीची मागणी जोर धरू लागली आहे.
महामंडळाचा सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने वर्षभराच्या नियोजित कार्यक्रमातून शिक्षण विषयक धोरणात्मक निर्णय शासनासमोर मांडण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे सदस्य अजित वडगावकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महामंडळाचे डॉ. सुधाकर जाधवर, राजीव जगताप, आबेदा इनामदार, गणपतराव बालवडकर, शरदचंद्र धारूरकर, विलास पाटील, अशोक मुरकुटेसह आदी संस्थाचालक उपस्थित होते.
महामंडळाची पाच दिवसांपूर्वी पुण्यात बैठक झाली. त्यात सांगलीला उद्घाटनाचे अधिवेशन, दुसरे अधिवेशन अमरावती, तर कार्यक्रमाचा समारोप धुळे येथे घेण्याचा निर्णय झाला. या अधिवेशनाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.