पोवई नाक्यावर राऊत, आव्हाड यांची गाढव यात्रा
सातारा: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ गुरूवारी सातारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला . राजघराण्याच्या समर्थनार्थ राजे समर्थक आक्रमकपणे रस्त्यावर उतरले संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांचे फलक गाढवाच्या गळ्यात अडकवून त्याची ताशाच्या गजरात धिंड काढण्यात आली . भाजपच्या वतीने मोती चौकात संजय राऊत यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले .
सातारा बंदचा फटका शाळा व महाविद्यालयांना तसेच सकाळच्या तातडीच्या सेवांना बसून दळणवळणं व व्यवहार पूर्णतः ठप्प झाले. खासदार संजय राऊत यांनी एका जाहीर कार्यक्रमात साताऱ्याच्या राजघराण्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे सातारा शहरात मोठे पडसाद उमटले . राजे समर्थकांनी आवाहन केलेल्या सातारा बंदला साताऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी व व्यावसायिक यांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवले. शाळा व महाविद्यालयांना बंदमुळे आयतीच सुट्टी मिळाली. दूध व तत्सम तातडीच्या सेवा कोलमडल्या तर शहर बससेवा व रिक्षा बंद झाल्याने शाळेत पोहचलेल्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले .पालकांना शाळेत पोहचून पाल्यांना घरी पोहोच करावे लागले .पेट्रोल पंपाची सेवा बंद झाल्याने वाहन चालकांचे हाल झाले तर सकाळी हॉटेल्स व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने दळणवळणं व व्यवहार शंभर टक्के बंद राहिले .
साताऱ्यात सकाळी दहा वाजता राजे रामर्थकांनी गोलबागेतील प्रताप सिंह महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निषेध रॅलीला सुरवात केली. राजे समर्थक राजवाडा मोती चौक देवी चौक कमानी हौद शाहू चौक मार्गे पोवई नाक्यावर पोहचले . छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून समर्थकांनी संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचे फलक गाढवाच्या गळ्यात अडकवून ताशा वाजवत त्याची वरात काढण्यात आली.