पाकिस्तानची दबा धरून बसलेली पाणबुडी शोधण्यात भारताला यश

प्रातिनिधिक छायाचित्र

बालकोटच्या एअर स्ट्राईकनंतर नौदलाकडून कसून शोधमोहिम

नवी दिल्ली – बालाकोटच्या एअर स्ट्राईकनंतर लपून बसलेल्या पाकिस्तानच्या आण्विक पाणबुडीला शोधून काढण्यात अखेर भारतीय नौदलाला यश आले आहे. ही पाणबुडी पाकिस्तानच्या पश्‍चिमेकडील किनाऱ्याजवळ असल्याचे आढळून आले आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदलाने अरबी समुद्रातील सर्व युद्धनौका माघारी बोलावल्या होत्या. भारताकडून नाविकदलाचा आक्रमकपणे वापर होईल, असा पाकिस्तानचा अंदाज होता. त्याचवेळी भारताकडून हवाई दलाने जैश ए मोहम्मदच्या अड्डयांवर हवाई हल्ला केला गेला. यावेळी भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या लष्कराच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले गेले होते. याच काळात पाकिस्तानच्या सागरी हद्दीतील “पीएनएस-साद’ ही अण्वस्त्रसज्ज पाणबुडी अचानक नाहिशी झाली. तेंव्हापासून या पाणबुडीचा कोणताही थांगपत्ता लागलेला नसल्याने भारतीय नौदलाकडून या पाणबुडीचा ठावठिकाणा शोधण्यास सुरुवात झाली होती.

“पीएनएस-साद’ही पाणबुडी कराची जवळ समुद्रामध्येच होती. तेथून 3 दिवसात ही पाणबुडी गुजरातच्या किनाऱ्यावर आणि 5 दिवसात मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचू शकली असती. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्मान होऊ शकला असता. त्यामुळे या हरवलेल्या पाणबुडीच्या शोधासाठी पाणबुडीविरोधी युद्धनौका आणि लढाऊ विमानेही तैनात करण्यात आल्या होत्या. गुजरात, महाराष्ट्र आणि अन्य राज्यांच्या किनाऱ्याजवळ या पाणबुडीचा कसून शोध घेतला जात होता. “पीएनस-साद’ ही भारतीय सागरी हद्दीमध्ये घुसली असल्याची शक्‍यता लक्षात घेऊन नौदलाकडून सर्व आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात होती.

पाकिस्तानच्या सागरी हद्दीजवळ “आयएनएस-चक्र’ ही आण्विक पाणबुडी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. या हरवलेल्या पाणबुडीकडून कोणताही घातपात होऊ नये यासाठी अलिकडेच नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केलेली “आयएनएस-कलावरी’कडूनही या पाणबुडीचा शोध घेतला जात होता.

आता या शोधाची व्याप्ती अधिक वाढवण्यात येत असून उपग्रहाकडूनही पाकिस्तानी पाणबुडीचा शोध घेतला जात होता. पण आता ही पाणबुडी पाकिस्तानच्य पश्‍चिम किनाऱ्याजवळ दडवून ठेवल्याचे आढळून आले आहे. बालाकोटच्या एअर स्ट्राईकच्या पार्श्‍वभुमीवर ऐनवेळेच्या वापरासाठी ही पाणबुडी तेथे दडवून ठेवण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)